CoronaVirus Lockdown News: गोंधळात गोंधळ निर्बंधांचा; अंमलबजावणी होणार कशी?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 02:03 AM2021-04-06T02:03:29+5:302021-04-06T02:03:29+5:30
नियमांबाबत परस्परविरोधी माहितीमुळे सर्वच संभ्रमात; पोलीस दल ठिकठिकाणी तैनात झाल्याने व्यवहार झाले ठप्प
मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून कठोर निर्बंध जारी केले मात्र सर्वसामान्य नागरिकांपासून हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांपर्यंत याबाबत प्रचंड संभ्रम आहे. महत्त्वाचे म्हणजे बाजारपेठा, दुकाने, व्यापारी, पानपट्टी असे अनेक घटक निर्बंधांच्या अंमलबजावणीबाबत पूर्णत: गोंधळात असून, संबंधितांकडून प्रचंड नाराजीचा सूर लगावला जात आहे. मुळात सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पुरेशी माहिती पोहोचलेली नाही. जी माहिती पोहोचली आहे? ती समाजमाध्यमांद्वारे पोहोचली असून, यातही समाजकंटकांकडून दिशाभूल करणारी अथवा घाबरविणारी माहिती पेरली जात असून, गोंधळ मिटण्याऐवजी वाढतच चालला आहे. याहून महत्त्वाचे म्हणजे व्यवहार नक्की कोणत्या वेळेत सुरू ठेवायचे? हा सर्वांत मोठा गोंधळ प्रत्येकाचा झाला असून, आता या निर्बंधांमुळे जे काही नुकसान होत आहे? ते कोण भरून देणार? असाही सवाल केला जात आहे.
रविवारी जारी झालेल्या निर्बंधांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली नाही. ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली आहे त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कारण या प्रत्येकासमोर आर्थिक नुकसान होईल, अशी भीती असून, इतरांच्या चुकांची शिक्षा आम्हास का ? असाही प्रश्न संबंधितांकडून विचारला जात आहे. व्यापारीवर्गाने तर रविवारपासूनच नाराजीचा सूर लगावला असून, कामगारांचे पगार द्यायचे कसे. लाईट बिल कसे? भरायचे?. इतर खर्च कसा करायचा? अशा प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
लॉन्ड्रीवाले तर यापेक्षाही संभ्रमावस्थेत आहेत. ज्यांचे पोट हातावर आहे. जे रोज कमावून रोज खात आहेत. ज्यांचे व्यवसाय रस्त्यांवर आहेत किंवा ज्यांच्या हातगाड्या आहेत. ठेला आहे. ठेल्यावर किंवा छोट्या दुकानात जे कपडे विकत आहेत. ज्यांचे मॅचिंग सेटर आहे. रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे; त्यांनी दुकान उघडे ठेवायचे? की बंद ठेवायचे? याबाबत नीट माहिती प्राप्त झालेली नाही. पोलिसांची गाडी आली की घाबरून हे लोक आपला व्यवसाय बंद करत आहेत. अशा लोकांनी जगायचे कसे? असा सवाल त्यांनी केला आहे.
पोलिसांच्या काय सूचना असणार आहेत. जेथे खासगी शिकवण्या सुरू आहेत त्यांनी सोमवारी शिकवणी घेतली असून, शिकविणी बंद करण्याबाबत काहीच माहिती पुरविण्यात आलेली नाही. असा गोंधळ सोमवारी तरी निदर्शनास आला असून, निर्बधांची अंमलबजावणी होण्यास मदत होईल किंवा गोंधळ कमी होण्यास मदत होईल, असे म्हणणेदेखील मांडण्यात आले आहे.