CoronaVirus Lockdown News: खाद्यपदार्थ घरपोच मागविणे शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 02:43 AM2021-04-10T02:43:54+5:302021-04-10T03:57:27+5:30
सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हाॅटेलात जाण्यास मनाई
मुंबई : शनिवार, रविवार असे दोन दिवस मुंबईत कडक लॉकडाऊन असला तरी ऑनलाईन कंपन्यांमार्फत खाद्यपदार्थ आणि ई-वस्तूचा पुरवठा घरपोच
करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार पुढील दोन दिवस रेस्टॉरंटमधून घरपोच खाद्यपदार्थ मागविता येतील. मात्र, या दोन दिवसांत ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये जाऊन पार्सल घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
शुक्रवार रात्री ८ वाजल्यापासून सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कडक लॉकडाऊनच्या काळात रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ ग्राहकांना घरपोच द्यावी. या दरम्यान, ग्राहकाला स्वतः उपहारगृहात, रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाद्यपदार्थ पार्सल घेता येणार नाही, असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सुधारित परिपत्रकातून स्पष्ट केले आहे.
डिलिव्हरी बॉयचे लसीकरण, चाचणी निगेटिव्ह असावी
रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉय यांना सुरक्षेचे सर्व नियम पाळून घरपोच खाद्यपदार्थ पोहोचवता येतील. मात्र, त्यासाठी त्यांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यांचे लसीकरण झाले नसल्यास त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. ही चाचणी १५ दिवसांसाठी वैध असेल. डिलिव्हरी बॉयचे लसीकरण झाले नसेल आणि त्याची कोरोना चाचणीही केलेली नसेल तर त्याला एक हजार रुपये दंड, तर रेस्टॉरंटला दहा हजार रुपये दंड केला जाईल. हा नियम मोडणाऱ्या रेस्टॉरंटचा परवाना ३० एप्रिलपर्यंत रद्द करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले.