Coronavirus, Lockdown News: मुंबईत तळीरामांमुळे पोलिसांची डोकेदुखी; प्रशासनही झाले हतबल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 01:51 AM2020-05-05T01:51:38+5:302020-05-05T01:51:55+5:30
मुंबईसह राज्यभरात विविध जबाबदारीचे ओझे पोलिसांच्या खांद्यावर आहे. लागण झालेल्या वस्त्या किंंवा इमारती पालिकेने ताब्यात घेतल्यानंतर तेथील बंदोबस्त आदी सर्वच जबाबदाऱ्या पोलिसांवर आहेत
मुंबई : मद्यविक्रीच्या दुकानांना मिळालेल्या ग्रीन सिग्नलमुळे तळीरामांनी रात्रीपासूनच दुकानाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली. आधीच विविध जबाबदारीने वाकलेल्या पोलिसांच्या खांद्यावर या गर्दीवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी पडल्याने आणखीन किती भार फक्त पोलिसांच्या खांद्यावर देणार, असा प्रश्न पोलिसांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
मुंबईसह राज्यभरात विविध जबाबदारीचे ओझे पोलिसांच्या खांद्यावर आहे. लागण झालेल्या वस्त्या किंंवा इमारती पालिकेने ताब्यात घेतल्यानंतर तेथील बंदोबस्त आदी सर्वच जबाबदाऱ्या पोलिसांवर आहेत. त्यात मुंबईत अडकलेल्या कामगार, पर्यटक, विद्यार्थी यांना परराज्यात पाठविण्याचा भार वाढला. ही गर्दी आवरता आवरता नाकीनऊ येत असताना, दारूच्या दुकानाबाहेर वाढलेल्या गर्दीने पोलिसांच्या डोकेदुखीत भर टाकली आहे.
रविवारी रात्रीपासूनच तळीरामांनी या दुकानांबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. सायन कोळीवाडा, माटुंग्यासह विविध भागांत लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसल्या. सोशल डिस्टन्सिंंगचे तीनतेरा वाजल्याने पोलिसांना मध्यस्थी घेत शॉप बंद करण्याची वेळ ओढावली. त्यात सोमवारी टोलनाक्यावरील वाहनांची गर्दी, तपासणीने पोलिसांना घाम फोडला. त्यामुळे पोलिसांवर आणखीन किती भार देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अन्य यंत्रणांनाही हाताशी घेणे गरजेचे असल्याचे मत पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा राज्यभरात वाढतोय
राज्यभरात सोमवारी पहाटे ४ वाजेपर्यंत ४२२ कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली आहे. तर ३४ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. यात २४ तासांत ६१ रुग्णाची भर यात पडली आहे. तर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईत विविध पोलीस ठाण्यातील पोलिसांचे कोरोना संसर्गही झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. सध्या सुरू असलेल्या तपासणीत हे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. त्यामुळे सगळेच पोलीस कोरोनाच्या विळख्यात अडकण्यापूर्वीच कामाचे योग्य नियोजन सरकारने करणे गरजेचे असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर गर्दी करत नियमांचे उल्लंघन करणाºयाविरुद्ध कड़क कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंबई पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितले आहे. तसेच या गर्दीकडे पोलिसांचे विशेष लक्ष असणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जेजे मार्ग पोलीस ठाण्याचे १२ पोलीस कोरोनाबाधित
सोमवारी जे. जे मार्ग पोलीस ठाण्याचे आणखीन १२ कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ६ अधिकारी आणि ४० अमलदारांना क्वारंटाइन करण्यात आले आहेत. तर यापूर्वी ५५ वर्षांवरील १८ जणांना सुट्टी देण्यात आली आहे.