CoronaVirus Lockdown News: रस्ते सामसूम, पण बाजारात धामधूम; निर्बंध कागदावरच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 02:20 AM2021-04-07T02:20:18+5:302021-04-07T02:20:33+5:30
अंधेरी, साकीनाका, पवईत सरकारी आदेशाला हरताळ
मुंबई : दादरमध्ये नेहमीपेक्षा गर्दी कमी होती. लोक काही प्रमाणात याला चांगला प्रतिसाद देत आहेत तर काही लोक मात्र अजूनही लोकल परिसरात तसेच फुलमार्केट परिसरात गर्दी करत आहेत. अनेक रस्त्यावरील धंदे बंद असल्याकारणामुळे मात्र व्यावसायिकांना याचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
व्यावसायिक निर्मल मोरे म्हणाले की, सरकारने परत एकदा निर्बंध लादल्यामुळे आम्हाला धंद्यामध्ये तोटा सहन करावा लागत आहे. सरकारने पोटापाण्याची सोय करावी आणि मग काय असेल तर लॉकडाऊन लावावे. बहुतेककरून दादर परिसरामध्ये मद्याच्या दुकानावर रांगा लागलेल्या दिसून आल्या. यानंतर मात्र फुलमार्केट परिसरामध्ये मात्र सकाळी गर्दी होती. मात्र पोलिसांनी काही काळानंतर गर्दी आटोक्यात आणली. रस्त्यावर बरीच दुकाने बंद असल्याकारणामुळे रस्त्यावर गर्दी कमी होती.
अंधेरी, साकीनाका, विद्याविहार आणि पवई परिसरात रस्ते सामसूम, पण बाजारात नेहमीसारखी धामधूम असे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले.
चांदिवलीतील दुकानदारांनी सरकारी आदेश अक्षरशः पायदळी तुडवले आहेत. मंगळवारी इथली एकूण एक दुकाने खुली होती. त्यात खेळण्यांपासून ते चष्म्याच्या दुकानांचा समावेश होता. रिअल इस्टेट एजंटांचे गाळेही याला अपवाद नव्हते. सलून, ब्युटीपार्लर, पानपट्ट्या, कपड्यांचे शोरूम अशी सगळी दुकाने पूर्वीप्रमाणे पूर्ण मनुष्यबळानिशी खुली होती. त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत कोणत्याही हालचाली दिसून आल्या नाहीत. पोलिसांची गाडी रस्त्यावरून फेऱ्या मारते, परंतु दुकान बंद करण्याच्या सूचना कोणत्याही व्यापाऱ्याला केल्या जात नाहीत, असेच चित्र होते.
सर्वाधिक वर्दळीचा विभाग असलेल्या साकीनाक्यातही पहिले पाढे पंचावन्न! येथे स्टेशनरीच्या दुकानापासून ते इंग्रजी भाषा शिकवणाऱ्या क्लासपर्यंत सर्वकाही सुरू होते. पुढे मित्तल इस्टेट परिसरात कपड्याचे मॉलही उघडे होते. मरोळ, जे.बी. नगर, चकाल्यातही हीच स्थिती होती. येथील रस्ते मात्र सामसूम होते. बऱ्याच कॉर्पोरेट कार्यालयांच्या कचेऱ्या असल्यामुळे एरवी या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. बैलबाजार, जरीमरी, सफेदपूल या भागांतील सर्व दुकाने खुली होती. येथील रस्त्यांवर मात्र नेहमीसारखी वाहतूक कोंडी नव्हती. उच्चभ्रू परिसर अशी ओळख असलेल्या पवई-हिरानंदानीतील बहुतांश दुकानदारांनी सरकारी निर्बंधांना केराची टोपली दाखवली.
गस्तीमुळे लालबाग, भायखळा परिसरात शुकशुकाट
राज्य शासनाने लावलेल्या कठोर निर्बंधांनंतर सायंकाळच्या वेळीस लालबाग आणि भायखळा परिसरात शुकशुकाट दिसून आला. मात्र सकाळच्या वेळेत भायखळा येथील भाजी मंडईत भाजी विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले. भायखळा येथील मुख्य भाजी मंडईबाहेर सायंकाळच्या वेळेस पोलिसांची गस्त असल्याने परिसरात शांतता दिसून आली, तर लालबाग परिसरात केवळ औषध विक्रेत्यांची दुकाने खुली असल्याचे दिसून आले.
मासळी बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
मालाड रेल्वेस्थानकाजवळील मासळी बाजारात कोळी महिला, होलसेल मासे विक्रेते यांच्यासह ग्राहकांनी गर्दी केली होती. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही स्थिती पाहायला मिळाली. मास्क लावणारे असे वावरत होते की, बाजारात ‘ब्रेक दि चेन’पेक्षा ‘जॉईन दि चेन’ असे चित्र हाेते.
...अन् दुकानदारांनी आणले सोंग
कोकणात शिमग्याला सोंग आणण्याची प्रथा आहे. पालिका आणि पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी अंधेरी स्थानक आणि पवई-हिरानंदानी परिसरातील दुकानदारांनी अनोखे सोंग घेत शिमग्याची प्रचिती आणून दिली. दुकान बंद असल्याचे सांगत शटर अर्ध्यावर ओढून घ्यायचे आणि ग्राहक आला की हळूच त्याला आतून वस्तू आणून द्यायची असे ते सोंग. पण अंधेरी स्थानकाजवळ पोलिसांनी दुकानदारांची अशी सोंगे उघडी पाडत कारवाई केली.
खरेदीसाठी तोबा गर्दी
लॉकडाऊनच्या भीतीने नागरिकांनी किराणा सामान भरण्यासाठी दुकानांबाहेर मोठी गर्दी केली. चांदीवली आणि पवई येथील डी-मार्टबाहेर मंगळवारी ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. या रांगांमध्ये अंतर नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले. काही जण मास्क हनुवटीखाली ओढून कोरोनाला निमंत्रण देतानाही दिसले.