CoronaVirus Lockdown News: चारकोप, बोरीवली बाजारपेठांत दुकाने उघडीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 02:17 AM2021-04-07T02:17:27+5:302021-04-07T02:17:35+5:30
मुंबई : अंशतः लाॅकडाऊनच्या राज्य शासनाच्या निर्णयाला बाजारपेठांनी आणि दुकानदारांनी पायदळी तुडविल्याचे चित्र कांदिवलीमधील चारकोप मार्केट आणि बोरीवलीमध्ये पाहायला ...
मुंबई : अंशतः लाॅकडाऊनच्या राज्य शासनाच्या निर्णयाला बाजारपेठांनी आणि दुकानदारांनी पायदळी तुडविल्याचे चित्र कांदिवलीमधील चारकोप मार्केट आणि बोरीवलीमध्ये पाहायला मिळाले. बोरीवलीमध्ये मुख्य बाजारपेठेत पोलिसांच्या गाडीमुळे रस्त्यावरील दुकाने बंद करण्यात आली तरी देवीपाडा, काजूपाडा, मागाठाणेसारख्या परिसरांतील छोट्या छोट्या बाजारपेठा फुल्ल गर्दीत सुरू असलेल्या पाहण्यास मिळत होत्या. तेथील दुकानदार आणि ग्राहक या दोघांनाही त्याची भीती नव्हती आणि हेच चित्र दिवसभर चारकोप मार्केटमध्येही दिसले.
कांदिवली, बोरीवली, मालाड परिसरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत येथील या मुख्य बाजारपेठांत होणारे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन, शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी न करता दुकानदार, व्यापाऱ्यांकडून होणारा निषेध आरोग्याच्या दृष्टीने घटक ठरू शकतो. खरेदी करण्यासाठी आलेल्या या गर्दीत कित्येक जणांनी तर मास्कही वापरला नसल्याचे दिसले.
९५ टक्के दुकाने बंद; पण किराणा मालाच्या दुकानाबाहेर रांगा
फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह म्हणाले की, कोरोना पार्श्वभूमीवर दुकाने बंद होती. दक्षिण मुंबईत पूर्णपणे बंद तर उपनगरांत सकाळी काही दुकाने सुरू करण्यात आली; पण नंतर बंद करण्यास सांगितले. मुंबईतील एकूण दुकानांपैकी ९५ टक्के दुकाने बंद होती. दरम्यान, अनेक ठिकाणी दुकाने बंद केली असली तरी फेरीवाले त्यांचा माल विकत होते, त्यावरही बंदी हवी.
पूर्व उपनगरात वादविवादानंतर शटर डाऊन
शासनाच्या नव्या नियमांबाबत व्यापाऱ्यांमध्ये असलेल्या संभ्रमामुळे पूर्व उपनगरातही वादविवादानंतर अखेर पोलिसांनी सर्वांना शटर डाऊन करण्यास सांगितले. त्यात दुपारनंतर भाजी मार्केट, महत्त्वाच्या रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळाला. मुलुंडच्या एम.जी. रोड, म्हाडा कॉलनी, भाजी मार्केट, स्टेशन परिसरात सकाळच्या सुमारास दुकाने सुरू होती. पोलिसांनी गस्त करत प्रत्येकाला दुकान बंद करण्यास भाग पाडले.
सुरुवातीला प्रेमाने समजावले, मात्र काही ठिकाणी दुकाने बंद करण्यास विरोध केला. पोलिसांनी त्यांना शासनाच्या नियमावलीबाबत माहिती देत दुकाने बंद करण्याची विनंती केली. अशात भाजी मार्केटमधील अन्य दुकाने बंद होती. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या भाजी मार्केटमध्ये काही प्रमाणात शुकशुकाट पाहावयास मिळाला.
अशात, विक्रोळी, कन्नमवार नगर २ भागातील व्यापाऱ्यांना शनिवार, रविवारी पूर्णत: लॉकडाऊनच्या दिवशी दुकाने बंद राहणार असल्याचे वाटल्यामुळे दुकाने सुरू ठेवली होती. मात्र त्यांनाही पोलिसांनी नियमाबाबत समजावून दुकाने बंद करण्यास भाग पाडले. अशाच प्रकारे, भांडुप, घाटकोपर परिसरातही हेच चित्र पाहावयास मिळाले. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी विरोध केला. मात्र पोलिसांनी क़ायदेशीर कारवाईचा धाक दाखवून त्यांना दुकाने बंद करण्यास सांगितले. अशात, पोलीस ठिकठिकाणी गस्त करत सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते. मिनी लाॅकडाउनमुळे अनेक ठिकाणी नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये नाराजाची सूर होता.