Join us

CoronaVirus Lockdown News: नियमांचे पथ्य पाळण्याकडे नाट्यसृष्टीचा कल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 2:24 AM

नाट्यगृहे ३० एप्रिलपर्यंत बंद

- राज चिंचणकर मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने इतर आस्थापनांसह नाट्यगृहेही ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला आणि बऱ्यापैकी सुरू असलेल्या नाटकांवर पूर्णतः पडदा पडला. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेने सुरू झाली. मात्र, यंदाच्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावाचे संकट नाटकांवरही कोसळले. नियमांचे पथ्य पाळण्याकडे नाट्यसृष्टीचा कल असून, नाट्यगृहे सध्या बंद झाल्याने ३० एप्रिलपर्यंत नाट्यरसिक नाटकांपासून दूर राहणार आहेत. सध्या नाटके थेट विंगेत गेली असली, तरी प्राप्त परिस्थितीत नाट्यसृष्टीचा कल मात्र एकूणच नियमांचे पथ्य पाळण्याकडे असल्याचे स्पष्ट होत आहे. ५ एप्रिलपासून नाट्यगृहे बंद झाल्याचा परिणाम नाट्यसृष्टीवर होणारच आहे. मात्र, याबाबत नाट्यवर्तुळात सध्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजणांना नाटक बंद झाल्यामुळे पुढे काय करायचे, असा प्रश्न पडला असला तरीही बऱ्याच जणांनी  याबाबत शासनाला साथ देण्याचे ठरवले असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीचा लॉकडाऊन बराच काळ होता. मात्र, सध्या केवळ २५ दिवस नाट्यगृहांचे दरवाजे बंद राहणार आहेत. सर्व नियम पाळले व कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला, तर नाट्यगृहांचा पडदा मे महिन्यात दिमाखात वर जाईल आणि पुन्हा एकदा नाटके रसिकांच्या दरबारी रुजू होतील; असा आशावाद सध्या नाट्यसृष्टीतून व्यक्त केला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या वाढला आहे आणि अशावेळी शासनाच्या आदेशांचे पालन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आयुष्याच्या वर्तमानातील हे दूषित पान उलटले की, माझ्या नाट्य कुटुंबातील प्रत्येक सदस्य रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होईल. तोपर्यंत आपण सर्व काळजी घ्यायला हवी. काहीही झाले तरी केवळ विरोधाला विरोध नको. आत्ता जर आपण नियम पाळले, तरच पुढे सर्वकाही व्यवस्थित होईल. - संतोष पवार, लेखक, दिग्दर्शक अभिनेतानाटक पुन्हा बंद पडल्यामुळे आता शंभर टक्के निराशा झाली आहे. मागच्या लॉकडाऊननंतर नाटक सुरू झाले; तेव्हा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे आम्ही खूप आनंदात होतो. मात्र, नाटकांवर पुन्हा पडदा पडल्याने, निराशा दाटून आली आहे. या सगळ्याचा एकूणच मन:स्थितीवर परिणाम होत आहे. सध्या आपण नियम पाळू. लवकरच नाटक सुरु होईल, अशी आशा आहे. - संकर्षण कऱ्हाडे, अभिनेता, लेखकमाझ्या नवीन नाटकाची तयारी जोरात सुरू होती. पण, तरीही थोडाफार अंदाज घेत आमचे काम चालले होते. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नाट्यगृह बंदचा घेण्यात आलेला निर्णय हिताचाच असल्याने तो मान्य करायला हवा. आम्ही कलाकार, मालिकांमध्ये वगैरे काम करून कार्यरत राहू शकतो. पण, जे लोक केवळ नाटकावर अवलंबून आहेत; त्यांची स्थिती खऱ्या अर्थाने गंभीर होणार आहे. पण तरी या संकटाचा आपल्याला गांभीर्याने सामना करायला हवा. - प्रसाद खांडेकर,अभिनेता, लेखक, दिग्दर्शकनाटक बंद झाले, याचे नक्कीच वाईट वाटत आहे. परंतु सध्याची एकंदर स्थिती पाहता शासनाने जो निर्णय घेतला आहे, तो आपण मान्य करायला हवा. ३० एप्रिलपर्यंत घरी बसायचेच आहे; तर सर्वांनी काटेकोरपणे नियम पाळले पाहिजेत. असे झाले तरच ३० तारखेनंतर आपले सगळे व्यवहार सुरळीत सुरू होतील. सध्या आपण थोडा धीर धरला पाहिजे आणि सगळी पथ्ये पाळली पाहिजेत. - कविता मेढेकर, अभिनेत्री

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या