CoronaVirus Lockdown : वीकेण्ड लॉकडाऊनमुळे महामुंबईत शटर डाऊन! सर्वत्र कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 04:27 AM2021-04-12T04:27:55+5:302021-04-12T07:02:05+5:30
CoronaVirus Lockdown : रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांत काही ठिकाणी बाजार सुरू होता, तर काही ठिकाणी दुकाने अर्धी उघडी होती.
मुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी लागू केलेल्या वीकेण्ड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीही संपूर्ण मुंबई महानगरात शुकशुकाट होता. सकाळचे तुरळक व्यवहार वगळले तर दुपारी, सायंकाळी धावत्या मुंबईचा वेग कमी झाला होता. ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघरमध्येही कडक लॉकडाऊन पाळण्यात आला.
रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांत काही ठिकाणी बाजार सुरू होता, तर काही ठिकाणी दुकाने अर्धी उघडी होती. दक्षिण मुंबईतील सर्व व्यवहार, बाजारपेठा, दुकाने रविवारी सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील काही ठिकाणांचा अपवाद वगळता शहर आणि ग्रामीण भागात व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त बंद पाळला. रविवारीही पाेलिसांचा रस्त्यांवर कडक पहारा हाेता. नवी मुंबईमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. अनेक ठिकाणी भाजी मंडईही बंद ठेवण्यात आल्या होत्या. रायगडमध्येही वीकेण्डच्या लाॅकडाऊनला नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
पालघर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
पालघरमधील पोलीस यंत्रणांनी नागरिकांशी चांगला समन्वय राखल्याने बहुतांश रस्ते निर्मनुष्य दिसत होते. रविवारी जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, वसई, विक्रमगड, जव्हार व मोखाडा तालुक्यांतील सर्व शहरांसह ग्रामीण भागात नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.