मुंबई: कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. या वीकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुन्हा एकदा शांत झाल्याचे चित्र आहे. लालबाग, भायखळा हा मार्केटचा परिसर असो वा करीरोड-लोअरपरळ विभागातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा गजबजाट असो या सर्व परिसरांत शनिवारी निर्जन शांतता दिसून आली. तर रस्ते दिवसभर मोकळे आणि निर्मनुष्य दिसून आल्याने स्थानिकांनी लाॅकडाऊनला उत्तम प्रतिसाद दिलेला दिसून आला.नेहमी वर्दळ आणि गर्दी असलेल्या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला. कामानिमित्त घराबाहेर रस्त्यांवर पडणाऱ्यांची पोलिसांकडून विचारणा होताना दिसून आली, तर दोन- तीन तासांच्या अंतराने पोलिसांची व्हॅन गस्त सुरू होती. शुक्रवारी रात्रीपासून हा लॉकडाऊन सुरू झाला. या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. करीरोडच्या मोनो स्थानकाखाली बसणाऱ्या फेरी विक्रेत्यांनी पोलीसांनी हाकलून दिले. इमारतींखाली उभे राहणाऱ्या तरुणांनाही पोलिसांनी समज दिली. अनेकांनी घरातच राहणे पसंत केले. लालबागच्या मार्केट परिसरातील अत्यावश्यक सेवेतील दुकानेही सुरू होती.
भायखळा पश्चिमेला सुंदरगल्ली वा स्थानक परिसरात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून दंड करण्यात आला. तसेच, भरदुपारी क्रिकेट खेळणाऱ्या पोरांच्या टोळक्यांनाही पोलिसांनी चांगलीच समज दिली. याखेरीज, भाय़खळा आणि करीरोड स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टॅक्सी चालकांनी टॅक्सींचे पार्किंग केले होते, आठवडाभराच्या तुलनेत शनिवारी या वाहनांमध्ये प्रवासीही कमी झाल्याचे दिसून आले.
चेंबूर कुर्ला परिसरात वाइन शॉप मालकांनीदेखील आपली दुकाने बंद ठेवली होती. मात्र तळीरामांनी दुकानांच्या बाहेर ठिय्या मांडला होता. एस. जी. बर्वे मार्गावर भरणारी बाजारपेठ, चेंबूरमधील कॅम्प, लालडोंगर तसेच रेल्वे स्थानक परिसरात भरणारी बाजारपेठ व सायन कोळीवाडा येथील मुख्य बाजारपेठदेखील बंद ठेवण्यात आली होती. नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले गेले.
वाशीनाका चेंबूर येथील वाशीनाका परिसरात वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. रस्त्यावर तुरळक प्रमाणात वाहने पाहायला मिळाली, तर रिक्षा आणि बसची संख्या कमी होती. बसमध्ये तुरळक प्रवासी होते. तसेच जे लोक घराबाहेर पडले होते ते मास्क आणि सोशल डिस्टसिंग पाळत होते. नेहमी गर्दी असलेल्या रस्त्यावर आज शुकशुकाट पाहायला मिळाला. आरसी मार्ग, आरएन पार्क, म्हाडा कॉलनी आदी भागात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला.
मालाडचे राईस प्लेट, पुरीभाजी केंद्रही बंदमुंबई : मालाडच्या सोमवार बाजार परिसरात इतर वेळी गजबजलेल्या भाजीच्या गल्लीतही शनिवारी शुकशुकाट पसरला होता. याठिकाणी छोट्या अंडाभुर्जीच्या तसेच वडापावच्या गाड्या उभ्या असतात. ज्याठिकाणी फेरीवाले, रिक्षाचालक नाश्ता किंवा जेवणासाठी येतात. शनिवारी अशा भोजनालयांनाही मोठे टाळे लावण्यात आल्याचे दिसत होते. त्यामुळे त्यांच्यावर जेवणासाठी अवलंबून असलेल्या चालक आणि कामगार वर्गाचे हाल झाले.
चेंबूर कॅम्पचेंबूर कॅम्प परिसरात वीकेंड लॉकडाऊनला अनेक ठिकाणी रिक्षाच्या रांगा पाहायला मिळाल्या. लॉकडाऊन असल्याने अनेक रहिवाशांनी घराबाहेर पडणे टाळले. चेंबूर कॅम्पमध्ये एकाच इमारतीमध्ये २४ कोरोना रुग्ण आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पूर्वी भाजीपाला, कपडे आणि इतर वस्तूसाठी खूप गर्दी असायची. मात्र, आता लॉकडाऊन असल्याने दुकाने बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर तुरळक वाहने पाहायला मिळाली.
मालाड, फळवाल्यांना प्रतीक्षा ग्राहकांचीमुंबई : मालाडच्या साईनाथ मंडईमध्ये भाजीवाले तसेच फळवाले ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसलेले दिसत होते. मात्र, त्याठिकाणी कोणीच फिरकले नसल्याचे आणलेला माल खराब होऊन नुकसानाची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.