मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १ हजार २०१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात १३७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४८ टक्के आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे.
राज्यात सध्या २२ हजार ९८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या राज्यात १,७६,१९१ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर ९६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२०,८०,२०३ प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त ६९३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (१४), नंदूरबार (०), धुळे (५), जालना (२७), लातूर (५०) परभणी (२९), हिंगोली (२२), नांदेड (१८), अकोला (२१), अमरावती (१६), वाशिम (०४), बुलढाणा (०५), नागपूर (८१), यवतमाळ (०५), वर्धा (५), भंडारा (३), गोंदिया (३), गडचिरोली (४) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १०० च्या खाली आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत अनेक सण येणार आहेत. याच दरम्यान काही समारंभाचं देखील आयोजन करण्यात येईल. मात्र यामुळेच लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होईल आणि हेच कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागचं कारण ठरू शकतं. सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. लोकांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे. घरच्या घरीच सण साजरे करा. सणांच्या काळात लोकांचा हलगर्जीपणा चिंता वाढवू शकतो. त्यामुळचे कोरोना नियमांचं पालन करा असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.
देशात दिवाळी यांसारखे अनेक सण पाहता तज्ञांनी इशारा दिला आहे. सध्याच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये घट होणे हे कोरोना संपत असल्याचे लक्षण नाही. अनेक ठिकाणी आजही मृत्युदर जास्त असल्याने काळजी घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. देशात वेगाने लसीकरण मोहीम हाती घेतली असून त्याचा फायदा होत आहे. आरोग्य तज्ज्ञांनी यूकेसारख्या देशांचा उल्लेख केला, जिथे कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. नवे नवे व्हेरिएंट आढळून आल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.