मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १ हजार ६३२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात १७४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे.
राज्यात सध्या २४ हजार १३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या राज्यात १,९८,९५८ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर ९९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१६,२६,२९९ प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त ६९५५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (१५), नंदूरबार (०), धुळे (४), जालना (५०), लातूर(६१), परभणी (२७), हिंगोली (२४), नांदेड (१६), अकोला (२२), अमरावती (१२), वाशिम (०४), अकोला (२३), बुलढाणा (१४), नागपूर (७२), यवतमाळ (०६), वर्धा (०५), भंडारा ०२), गोंदिया (०३), चंद्रपूर (५७) गडचिरोली (७) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
तत्पूर्वी, कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेबाबतच्या शक्यता आणि धोक्याची चर्चा केली जाऊ लागली होती. तिसऱ्या लाटेबाबत अनेक शंका देखील उपस्थित करण्यात आल्या. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना तिसऱ्या लाटेसाठी निर्णायक महिना ठरेल असं सांगितलं गेलं होतं. पण आता तिसऱ्या लाटे संदर्भातील एक दिलासादायक माहिती आता समोर आली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार कोरोना प्रादुर्भावाच्या आणखी एका लाटेची कोणतीही शक्यता सध्या दिसून येत नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील अंतराचा अभ्यास करता तिसरी लाट ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात येऊ शकते, अशी शक्यता काही वायरोलॉजिस्ट आणि डॉक्टरांनी वर्तवली होती.
तज्ज्ञांच्या मतानुसार ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत जीनोम सिक्वेंसिंग आणि इतर अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार अद्याप व्हायरसच्या म्युटेशनचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. याशिवाय विषाणुचा नवा व्हेरिअंटही समोर आलेला नाही. दरम्यान, सरकार आणि तज्ज्ञांनी फेब्रुवारी २०२२ पर्यंत कोविड नियमांचं पूर्णपणे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. कारण तोवर कोरोना विरोधी लसीकरणात देशाला मोठं यश आलेलं असेल आणि परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक पद्धतीनं पाहायला मिळेल.
नव्या व्हेरिअंटची शक्यता फारच कमी-
डॉ. व्ही रवी यांच्या म्हणण्यानुसार दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेपर्यंत मर्यादित असलेले Mu आणि C.1.2 सारखे नवे व्हेरिअंट भारतात येण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यातही नवा व्हेरिअंट आलाच तर तो डेल्टा किंवा डेल्टा प्लस इतका घातक नसेल. डेल्टा प्लस हाच दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत व्हेरिअंट होता.