मुंबई: राज्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज २ हजार ४४६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आज दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ हजार ४८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ९९ हजार ४६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के आहे.
पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त ८४२२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (१६), नंदूरबार (५), धुळे (८), जालना (६०), परभणी (८९), हिंगोली (१९), नांदेड (०८), अकोला (२६), वाशिम (०५), बुलढाणा (०९), नागपूर (८२), यवतमाळ (०६), वर्धा (३), भंडारा (१), गोंदिया (३), गडचिरोली (१४) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १०० च्या खाली आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ५७ हजार ३२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ७५ हजार ५७८ (१०.९५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४१ हजार ४९९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ०२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
दरम्यान, मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ९४९ इतकी वाढली आहे. तर, रत्नागिरीत ५६० इतकी कमी झाली आहे, सिंधुदुर्गात ६७९ इतकी वाढली आहे, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८०९ इतकी झाली आहे.