मुंबई : राज्यात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ७४ हजार ७७० हजार इतकी असून ११ मेपर्यंत त्यात २ लाख ४३ हजार ५८ ने वाढ होऊन ही संख्या ९ लाख १७ हजार ८२९ पर्यंत जाईल, असा अंदाज सार्वजनिक आरोग्य विभागाने वर्तविला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत झालेल्या सादरीकरणात ही माहिती देण्यात आली.
कोरोनाचा हॉटस्पाट बनलेल्या नागपुरात ११ मे रोजी १ लाख १३ हजार ९३ सक्रिय रुग्ण असतील. त्या दिवशी मुंबईत ६४,५०७, ठाणे ७९,०९५, नाशिक ९५,१९६, पुणे १,२०,३७६ अशी काही जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांची संख्या असेल असा अंदाज आहे.१ ते २७ एप्रिल २०२१ या कालावधीत रुग्णसंख्या १५ लाख ९७ हजार ०१९ इतकी होती.
सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या ५९,१४९ होती. ११,२५१ मृत्यू झाले. मृत्यूदर ०.७० टक्के इतका होता. राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येचा विचार करता दहा जिल्ह्यांमध्ये संख्या सर्वाधिक आहे. त्यात पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, नाशिक, चंद्रपूर, अहमदनगर, सातारा, पालघर, सोलापूर यांचा समावेश आहे. राज्यात सध्या किती आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत, याची माहितीदेखील या सादरीकरणात देण्यात आली. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी, ४५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती यांच्या लसीकरणाबाबतची आकडेवारीदेखील देण्यात आली.
धोका अजून टळलेला नाही
राज्यासह मुंबईतील कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. अजूनही नियम शिथिल केल्यास पुन्हा प्रादुर्भाव वेगाने पसरताना दिसेल, त्यामुळे इतक्यात नियमांत शिथिलता आणून उपयोग नाही. राज्यातील १३-१४ जिल्ह्यांत बरे होण्याचा दर चांगला आहे. मात्र पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये अजूनही रुग्णसंख्येचा आलेख चढा आहे. – डॉ. शशांक जोशी, तज्ज्ञ, कोरोना टास्क फोर्स