मुंबई: राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १५ हजार १६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर २९ हजार २७० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज दिवसभरात २८५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्यातील आरोग्य विभागाने दिली आहे.
आजपर्यंत एकूण ५४,६०,५८९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५४% टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५५,१४,५९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,७६,१८४ (१६.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,८७,६४३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,४१८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत देखील गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज ७ ते ११ हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते, त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ९२५ नव्या कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. १६३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात 'कोरोनामुक्त गाव' स्पर्धेची घोषणा-
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० मे रोजी राज्यातील जनतेशी संवाद साधताना प्रत्येकानं आपलं गाव करोनामुक्त कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करण्याचं आवाहन केलं होतं. माझं गाव कोरोनामुक्त मोहिमेची सुरुवात राज्य सरकार करणार असल्याचंही ते म्हणाले होते. त्यात आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गावातील नागरिकांना प्रेरणा मिळण्यासाठी 'कोरोनामुक्त गाव' स्पर्धेची घोषणा केली आहे. यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गावाला तब्बल ५० लाखांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. तसेच गावातील विकास कामासाठी प्राधान्य दिलं जाईल, असंही जाहीर करण्यात आलं आहे.