Coronavirus in Maharashtra : २० वर्षांच्या आतील ७३ हजार मुलांना लागण, तीन महिन्यांत ८,४४,८३३ रुग्ण
By अतुल कुलकर्णी | Published: April 2, 2021 05:35 AM2021-04-02T05:35:00+5:302021-04-02T05:36:04+5:30
Coronavirus in Maharashtra : महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असून जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यात शून्य ते १० वर्षे वयाच्या २०,१७१ मुलांना, तर ११ ते २० वर्षे वयोगटातील ५३,३६५ मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.
- अतुल कुलकर्णी
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असून जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यात शून्य ते १० वर्षे वयाच्या २०,१७१ मुलांना, तर ११ ते २० वर्षे वयोगटातील ५३,३६५ मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याचा अर्थ ० ते २० वर्षे वयातील ७३,५३६ मुले तीन महिन्यात बाधित झाली आहेत. कोरोनाचा सर्वात जास्त फटका ३१ ते ४० वर्षे वयोगटातील तरुणांना बसला आहे. या वयोगटातील १,७७,७६९ जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.
४५ वर्षे वयाच्या पुढील लोकांना देण्यास सुरुवात झाली असली तरी युवकांना कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होऊन ते ‘सुपर स्प्रेडर’ बनत असल्याने सरसकट सर्वांनाच लस देण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च २०२० मध्ये सापडला. तेव्हापासून ते डिसेंबर २०२० या १० महिन्यात राज्यात ० ते २० वयोगटातील १,९६.२२५ मुलं बाधित झाली होती. त्यात जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यात ७३,५३६ नव्या मुलांची भर पडली आहे. त्यापैकी ० ते २० या वयोगटातील बाधित मुलांची एकूण संख्या २,६९,७६१ एवढी झाली आहे. राज्यात या तीन महिन्यात एकूण बाधितांची संख्या ८,४४,८३३ आहे. तर याच कालावधीत मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ४९५९ आहे. राज्यात हा मृत्यूदर ०.५८ टक्के असला तरी नागपूर विभागात मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. ३१ मार्च रोजी राज्यात २२७ रुग्ण दगावले त्यातील ७१ रुग्ण विदर्भातील आहेत.
का होतोय संसर्ग?
तरुण रुग्ण खूप शेवटच्या क्षणी रुग्णालयात येतात, पहिले काही दिवस आजार अंगावर काढतात.
त्यामुळे अशांना प्रयत्न करुनही वाचवणे अशक्य होत असल्याचे निरीक्षण आहे, असे टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक म्हणाले.
वैद्यकीय शिक्षण विभागाने १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या तीन महिन्याचा विस्तृत अहवाल तयार केला आहे. याच्या आधारे कदाचित लॉकडाऊनचा निर्णय होऊ शकेल, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने लोकमतशी बोलताना म्हणाले, तरुण वयात व लहान वयात कोरोनाची लागण होत असली तरी त्यांची प्रतिकार शक्ती चांगली असल्याने ते लवकर बरे होत आहेत.
यावेळी जो स्ट्रेन आला आहे तो जास्त लोकांना बाधित करत असला तरी त्यातून बरे होण्याचे प्रमाण ही जास्त चांगले आहे.
तुम्ही कोणत्या वयोगटात मोडता?
जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यात वयोगटानुसार आढळलेले रुग्ण
वयोगट एकूण रुग्ण
० ते १० वर्षे २०,१७१
११ ते २० वर्षे ५३,३६५
२१ ते ३० वर्षे १,३६,८०५
३१ ते ४० वर्षे १,७७,७६९
४१ ते ५० वर्षे १,५०,२८०
५१ ते ६० वर्षे १,३०,९९३
६१ ते ७० वर्षे ९१,३७८
७१ ते ८० वर्षे ४५,१९६
८१ ते ९० वर्षे १३,२२९
९१ ते १०० वर्षे १,६६०
१०१ ते ११० वर्षे १२५
एकूण ८,२०,९७१
(वयोगटानुसार तीन महिन्यातील एकूण रुग्ण जरी ८,२०,९७१ असले तरी प्रत्यक्षात अनेकांनी वयाचा उल्लेख केलेला नाही. या तीन महिन्यात राज्यात एकूण रुग्ण ८,४४,८३३ एवढे झाले आहेत.)