Join us

Coronavirus: 'कोरोना गो.. म्हटल्यामुळेच महाराष्ट्र अन् देशात तो जास्त आला नाही' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 3:43 PM

मी कोरोना गो असं म्हटलेलं आहे, त्यामुळे तो महाराष्ट्रात काय किंवा इंडियामध्ये जास्त आलेला नाही. तरीही, आम्ही त्याची पूर्वकाळजी घेत आहोत

मुंबई - संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र, अशातच कोरोना व्हायरसचे देशात 73 रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी गो कोरोना गो... कोरोना गो... असे म्हणत कोरोनाला भारतातून घालवणार असल्याचं म्हटलं होतं. आता, मी गो कोरोना गो.. म्हटल्यामुळे कोरोना महाराष्ट्रात आला नसल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे.  

कोरोना रुग्णांवर पुण्यासह देशभरातील विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. याबाबत मोठ्या प्रमाणात जगजागृती करण्यात येत आहे. आरोग्यमंत्र्यांकडूनही योग्य ती माहिती पुरविण्यात येत आहे. त्यातच, केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

Video : कोरोना गो... गो कोरोना गो... व्हायरसला पळविण्यासाठी आठवलेंची प्रार्थना

त्यामध्ये, चायना-इंडिया साँग असे म्हणत, रामदास आठवले कोरोनो गो... गो कोरोना... गो... असे म्हणत आहेत. तर, आठवलेंसमवेत असलेला विदेशी नागरिकही गो कोरोना... कोरोना गो... असे म्हणताना आपण पाहिलं. आठवलेंच्या या व्हिडीओवरुन अनेकांनी त्यांना ट्रोल केलंय. तसेच, केंद्रीयमंत्र्यांना हे शोभतं का, असा सवालही नेटीझन्सने केला. मात्र, जोपर्यं कोरोना जात नाही, तोपर्यंत मी गो कोरोना... म्हणतच राहणार असे आठवेलंनी म्हटले आहे.

मी कोरोना गो असं म्हटलेलं आहे, त्यामुळे तो महाराष्ट्रात काय किंवा इंडियामध्ये जास्त आलेला नाही. तरीही, आम्ही त्याची पूर्वकाळजी घेत आहोत. आम्ही कोरोनाला जायला सांगितलं आहे. पण, त्याची काळजी घेणं, ही आपली जबाबदारी आहे. डॉक्टरांची जबाबदारी आहे, आपल्या गावात, आपल्यामध्ये आला नाही पाहिजे, यासाठीही काळजी आपण घेतली पाहिजे, असे रामदास आठवलेंनी म्हटले आहे. जोपर्यंत कोरोना जात नाही, तोपर्यंत कोरोन गो, कोरोना गो...असं म्हणतच राहणार आहे. कोरोना गो म्हणत म्हणत महाविकास आघाडी गो... असंही आम्हाला म्हणावं लागेल, असे म्हणत रामदास आठवलेंनी राजकीय टोलाही लगावला. आठवले यांनी राज्यसभा निवडणुकांसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

टॅग्स :रामदास आठवलेकोरोनामुंबईराज्यसभा