मुंबई : कोविड - १९ या आजारावर बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठाने बनविलेल्या ‘दिव्य कोरोनानील’ या कथित औषधावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली आहे. आयुष मंत्रालयाची या औषधाला परवानगी मिळाल्याशिवाय त्याची राज्यात विक्री करता येणार नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. बुधवारी रात्री त्यांनी टिष्ट्वट करून ही माहिती दिली.रामदेव बाबांच्या कोरोनावरील औषधावर बंदी घालणारे महाराष्ट्र हे राज्यस्थाननंतरचे दुसरे राज्य आहे. रामदेव बाबा आणि त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्णन यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन कोरोना रुग्णाला बरे करणारे आयुर्वेदिक औषध बनविल्याचा दावा केला. मात्र कोणत्याही अधिकृत चाचणी आणि आयुष मंत्रालयाच्या मान्यतेशिवाय बाजारात आणलेल्या या औषधाच्या सत्यतेबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. आयुषने या औषधाची जाहिरात करण्यास बंदी घातली आहे. सोशल मीडियावरही रामदेव बाबांच्या दाव्यावर टीकेची झोड उठली आहे. त्याची दखल घेत गृहमंत्री देशमुख यांनी या औषधावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी सांगितले की, काहीही झाले तरी लोकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. अधिकृत मान्यता मिळत नाही, तोपर्यंत हे औषध स्वीकार्य नाही, असेही त्यांनी टिष्ट्वटद्वारे स्पष्ट केले आहे.
CoronaVirus: महाराष्ट्रात पतंजलीच्या ‘कोरोना’ औषधावर बंदी - गृहमंत्री देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 5:00 AM