धाेका वाढला; मुंबईत 578 इमारती सील, अंधेरी पश्चिमेतील सर्वाधिक इमारती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 08:01 AM2021-03-30T08:01:02+5:302021-03-30T08:01:59+5:30
Coronavirus in Maharashtra : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची संख्या इमारतींमध्ये अधिक आहे. परिणामी, सील इमारती आणि मजल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची संख्या इमारतींमध्ये अधिक आहे. परिणामी, सील इमारती आणि मजल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २८ मार्च २०२१ पर्यंत ५७८ इमारती, तर ७४७५ मजले सील करण्यात आले आहेत. यापैकी अंधेरी पश्चिम विभागात सर्वाधिक १३७ इमारती आणि मुलुंडमध्ये १४९० मजले सील करण्यात आले.
मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर चाळी-झोपडपट्ट्यांमध्ये रुग्ण संख्या अधिक होती. चेस दि व्हायरस, माझी मुंबई-माझी जबाबदारी, मिशन झिरो अशा काही मोहीम राबवून पालिकेने संसर्ग नियंत्रणात आणला. मुंबई कोरोनामुक्त होणार असे वाटत असताना गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्ग पुन्हा सुरू झाला. चाळी-झोपड्यांपेक्षा बाधित ९० टक्के रुग्ण यावेळी इमारतीतील आहेत.
दैनंदिन रुग्णसंख्येत सर्वाधिक रुग्ण इमारतींमधील असल्याने पालिकेची चिंता वाढली आहे. दोन बाधित रुग्ण सापडल्यास इमारतीचा मजला, तर पाच रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्यात येत आहे. त्यानुसार २ मार्च रोजी मुंबईत २०१६ मजले सील होते, तर प्रतिबंधित इमारती १४५ होत्या. महिन्याभरात यामध्ये मोठी वाढ होऊन तब्बल ७४७५ मजले आणि ५७८ इमारती सध्या सील करण्यात आल्या.
हे आहेत सर्वाधिक सील इमारती असलेले विभाग
के पश्चिम - अंधेरी पश्चिम १३७
डी - ग्रँट रोड, मलबार हिल ७२
एम पश्चिम - चेंबूर ६३
एफ दक्षिण - परळ ४८
सर्वाधिक मजले सील असलेले विभाग
टी - मुलुंड १४९०
के पश्चिम - अंधेरी प. ११८४
एच पश्चिम - वांद्रे पश्चिम ६७४
पी उत्तर - मालाड ६४३
के पूर्व - जोगेश्वरी, अंधेरी पूर्व ४७२
जी उत्तर - दादर, माहीम ४५७
तीन लाख घरांमधील ११ लाख ८४ हजार रहिवासी क्वारंटाइन
सील करण्यात आलेल्या ५७८ इमारतींमध्ये ६६ हजार घरांमध्ये दोन लाख ६५ हजार रहिवासी आहेत, तर ७४७५ मजले सील असल्याने तीन लाख घरांमधील ११ लाख ८४ हजार रहिवासी क्वारंटाइन आहेत.
सील मजल्यांमधील इमारतींमध्ये घरकाम करणाऱ्या महिला, मजूर, वृत्तपत्र-दूध विक्रेते यांच्या चाचण्या केल्या जात आहेत. गृहनिर्माण सोसायट्यांमधील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होम क्वारंटाइन लोकांवर नजर ठेवली जात आहे.
नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील लोकांमध्ये लक्षणे नसली तरी सातव्या दिवशी कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.
२०.३२ टक्क्यांनी वाढले रुग्ण
राज्यात मागील २५ दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत २०.३२ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. ४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत रुग्णसंख्या आठ टक्क्यांनी वाढली आहे. या काळात १ लाख १९ हजार ६८ रुग्ण आढळून आले. १ ते २५ मार्चदरम्यान ४ लाख ३९ हजार ३६६ रुग्णनिदान झाले. या संख्येनुसार राज्यात चार पटीने रुग्ण वाढल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.