Coronavirus : महाराष्ट्र आजपासून बंद; लोकल, लांबपल्ल्याच्या रेल्वेसह एसटी, खासगी बसगाड्या, रस्ते वाहतूकही बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 02:46 AM2020-03-23T02:46:49+5:302020-03-23T06:08:13+5:30
Coronavirus : रविवारी राज्यात १० नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी पुणे येथील ४, मुंबईचे ५ तर नवी मुंबई येथील १ रुग्ण आहे. राज्यातील बाधितांची संख्या आता ७४ झाली आहे.
मुंबई / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळाल्याने रविवारी पुकारलेला जनता कर्फ्यु अभूतपूर्व यशस्वी झाला. दिवसभर संपूर्ण देश जवळपास स्तब्ध झाल्याचे दिसून आले. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी रविवारी मध्यरात्रीपासूनच राज्यातील नागरी भागात कलम १४४ लागू केले आहे. यामुळे एक प्रकारे शहरी भाग ‘लॉक डाऊन’ करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात रेल्वे, खासगी बसेस, एस.टी. बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत. केवळ जीवनावश्यक व अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा चालविली जाणार आहे. सरकारी कार्यालयांतील उपस्थितीसुद्धा अवघ्या पाच टक्क्यांवर आणण्यात आली असून केवळ अन्नधान्य, भाजीपाला, औषधे दुकानेच सुरू राहणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
रविवारी राज्यात १० नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी पुणे येथील ४, मुंबईचे ५ तर नवी मुंबई येथील १ रुग्ण आहे. राज्यातील बाधितांची संख्या आता ७४ झाली आहे. एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ६३ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला. हा राज्यातील दुसरा मृत्यू आहे.
रेल्वे मंत्रालयाने रविवारी देशभरातील रेल्वे व उपनगरीय सेवा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. वित्तीय सेवा देणाऱ्या शेअर बाजार आणि बँकासारख्या संस्था सुरुच राहतील. आवश्यकता भासल्यास ३१ मार्चनंतरही संबंधित कठोेर उपाययोजना चालू ठेवल्या जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अमेरिकेतील ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी स्थिती जगभर निर्माण झाली आहे. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जनतेने आतापर्यंत जी जिद्द व संयम दाखविला तो पुढील काळातही चालू ठेवावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
दोन दिवसांत राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसते आहे. हे थांबवायचे असेल तर सूचनांचे पालन करा. यंत्रणेत काम करणारी ही माणसेच आहेत, याची जाणीव करून देतांना अत्यावश्यक सेवा देणा-या यंत्रणेवरचा ताण न वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मृत रुग्णाची पत्नीही कोरोनाबाधित
मुंबईतील मृत रुग्णाची पत्नीही रविवारी कोरोनाबाधित आढळली आहे. ती देखील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात भरती झाली आहे. या महिलेचे वय ६४ आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील (मुंबईत दोन मृत्यू)
पिंपरी चिंचवड मनपा - १२, पुणे मनपा - १५, मुंबई - २४, नागपूर - ०४, यवतमाळ - ०४, कल्याण - ०४, नवी मुंबई - ०४, अहमदनगर - ०२, पनवेल - १, ठाणे - १, उल्हासनगर - १, औरंगाबाद - १, रत्नागिरी - १
एकूण - ७४