मुंबई : राज्यात बुधवारी ६३,३०९ रुग्णांचे निदान झाले असून, ९८५ मृत्यू झाले आहेत. तर राज्यात सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन मृत्यूच्या उच्चांकाची नोंद झाली आहे. राज्यात सध्या ६,७३,४८१ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ४४,७३,३९४ असून, मृतांचा आकडा ६७,२१४ आहे.
राज्यात दिवसभरात ६१,१८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ३७,३०,७२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.४ टक्के झाले असून, मृत्यूदर १.५ टक्क्यांवर आहे. आजपर्यंत तपासलेल्या २,६५,२७,८६२ नमुन्यांपैकी १६.८६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४२,०३,५४७ व्यक्ती होम क्वारंटिन, तर ३१,१५९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटिनमध्ये आहेत.
राज्यात १ कोटी ५३ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण
राज्यात मंगळवारी ३ हजार ७१८ व्या लसीकरण सत्रात ३ लाख ८८ हजार २४७ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण १ कोटी ५३ लाख ३७ हजार ८३२ लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात आतापर्यंत १० लाख ९९ हजार ४१५ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ६ लाख ९ हजार ७९० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. १२ लाख ७४ हजार ४९२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ४ लाख ५८ हजार ५८६ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ६७ लाख १ हजार ९३ लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे.
मुंबईत ४ हजार ९६६ रुग्ण, तर ७८ मृत्यू
मुंबईत बुधवारी ४ हजार ९६६ रुग्णांचे निदान झाले असून ७८ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ४० हजार ५०७ झाली असून मृतांचा आकडा १२ हजार ९९० आहे. शहर उपनगरात दिवसभरातील रुग्ण निदानाच्या तुलनेत पुन्हा एकदा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याने मुंबईकरांसाठी ही सकारात्मक बाब आहे.
दिवसभरात ५,३००रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ५,६०,४०१ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. मुंबईत सध्या ६५,५८९ रुग्ण सक्रिय आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात ३९,१३५ चाचण्या केल्या असून एकूण ५३,४१,६२५ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८७ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७४ दिवसांवर आहे. २१ ते २७ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.९३ टक्के असल्याची नोंद आहे. मुंबईत तीव्र संसर्गाच्या काळात १४ टक्के असलेला पॉझिटिव्हीटी दर कमी होऊन ११.९१ टक्क्यांवर आला आहे. मागील चोवीस तासांत रुग्णांच्या संपर्कातील २८ हजार १०५ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.