CoronaVirus in Maharashtra: गृहमंत्र्यांकडे २१ तर भुजबळांकडे २२ कर्मचारी कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 11:33 AM2022-01-08T11:33:49+5:302022-01-08T11:34:29+5:30
मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानासह कार्यालयाशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या नियमित चाचणीत २२ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील दोघांना लक्षणे आढळल्याने भायखळा येथील कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मंत्री, आमदार आणि राजकीय नेत्यांपाठोपाठ राज्याच्या कारभाराचा गाढा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे शासकीय निवासस्थान आणि कार्यालयातील २२ जणांना तर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कार्यालयातील २१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर संसर्गाचे वृत्त आल्याने मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून मंत्रालय प्रवेशावर निर्बंध आणतानाच नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानासह कार्यालयाशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या नियमित चाचणीत २२ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील दोघांना लक्षणे आढळल्याने भायखळा येथील कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. इतरांना लक्षणे नसल्याने गृहविलगीकरणात पाठविण्यात आले आहे. मंत्री भुजबळ यांच्या कुटुंबातील चार सदस्यांनाही लागण झाल्याचे समजते.
तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील २१ जणांना कोरोनाची लागण झाली असून चाचणी केलेल्या १५ जणांचे अहवाल येणे बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या सचिवालाही कोरोनाची लागण झाली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले होते का, याबाबत माहिती मिळू शकली नाही.
याशिवाय, वैद्यकीय शिक्षण, महसूल विभागासह शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही लागण झाल्याचे समजते तर, विधी व न्याय विभागातही सहाजणांना कोरोना संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. विविध विभागातून मोठ्या प्रमाणावर लागण झाल्याचे वृत्त आल्याने मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
अर्धा डझन मंत्री आणि राज्यभरातून सत्तरहून अधिक आमदारांना कोरोना लागण झाल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता मंत्री कार्यालय आणि निवासातही कोरोना आढळून आल्याने मंत्रालयात याचे लोण पसरण्याआधी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली आहे.
प्रवेशासाठी हवी कठोर नियमावली
आरोग्य आणीबाणीच्या काळात प्रशासनाचा गाडा सुरळीत ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे मंत्रालयात प्रवेश देताना नियमांची कठोर अंमलबजावणी व्हायला हवी. लसींचे दोन्ही डोस घेतलेले आहेत का, हे काटेकोरपणे तपासले गेले पाहिजे. प्रवेश देताना तापमान तपासून अन्य कोणती लक्षणे नाहीत ना, हेही पाहिले गेले पाहिजे. दुसरी लाट ओसरल्यापासून तापमान तपासणे, लक्षणे नाहीत ना, याची खातरजमा करण्याचे पूर्णपणे थांबले आहे. कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक खबरदारी कसोशीने पाळली गेली पाहिजे, अशी भावना मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी व्यक्त करत आहेत.