- राज चिंचणकर मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने, विविध क्षेत्रे प्रभावित होत आहेत. त्यातच पुन्हा लॉकडाऊनचे संकट उद्भवल्यास व्यावसायिकांची स्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. नाट्य व्यवसायावरही याचे परिणाम ओघाने दिसून येतील. गेल्या डिसेंबर महिन्यापासून अनलॉकच्या माध्यमातून नाट्यगृहांमध्ये प्रयोग सादर करण्यास सुरुवात झाली, त्याला आत्ता कुठे शंभर दिवस होत आहेत. मात्र, नाट्यगृहांवर पुन्हा पडदा पडल्यास एकूणच नाट्य व्यवसायाची ‘शंभरी’ भरेल, अशी चर्चा नाट्यवर्तुळात सुरू झाली आहे. गेल्या वर्षात नाट्य व्यवसायाने लॉकडाऊनचे खूप चटके सोसले. गेल्या मार्च महिन्यात लावलेल्या लॉकडाऊननंतर, तब्बल ५ नोव्हेंबरच्या मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून नाट्यगृहे उघडली गेली. असे असले तरी प्रत्यक्षात रंगभूमीवर प्रयोग सादर होण्यास मात्र अर्धाअधिक डिसेंबर महिना जावा लागला. त्यातही केवळ ५० टक्के प्रेक्षक क्षमतेनेच नाट्यगृहे सुरू झाली. काही नाटकांनी ‘मागच्या पानावरून पुढे सुरू’ या तत्त्वानुसार प्रयोग सुरू केले. प्रारंभी लॉकडाऊनच्या आधी सुरू असलेलीच नाटके पुन्हा रंगभूमीवर आली. यंदाच्या फेब्रुवारीपासून नाट्यक्षेत्रात काही घडामोडी घडू लागल्या आणि मार्च महिन्यात दोन-तीन नवीन नाटके रंगभूमीवर आली. नाट्य व्यवसाय आता कुठे थोडाफार स्थिरावतोय असे वाटत असतानाच, आता पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार नाट्यक्षेत्रावर आहे. साहजिकच, नजिकच्या भविष्यकाळात नाट्य व्यवसायावर नक्की काय संकट ओढवणार, याची चिंता नाट्यक्षेत्राला आहे. नाट्यगृहे पुन्हा बंद होऊ नयेत, अशी अपेक्षाही नाट्यसृष्टीत व्यक्त केली जात आहे. ...तर मराठी नाटक बॅकफूटवर जाईलआपल्याकडे जे नियम आहेत, ते नीट अंमलात आणले जात नाहीत. कोरोनाच्या बाबतीत म्हणायचे तर जे नियम लागू केले आहेत, ते कडकपणे राबविले गेले पाहिजेत. आत्ता कुठे नाट्य व्यवसाय मुंगीच्या वेगाने हळूहळू सुरू होत आहे. काही कलाकार तसेच बॅकस्टेज कलावंतांपैकी काही जणांकडेच काम आहे. आता पुन्हा लॉकडाऊन झाला, तर स्थिती अतिशय भयावह होईल आणि मराठी नाटक पुन्हा बॅकफूटवर जाईल. लोकांनीही आपापली जबाबदारी ओळखून वागायला हवे. - प्रशांत दामले (अभिनेते व निर्माते) नाट्यगृहे पूर्ण बंद हाेतील असे वाटत नाहीगेले संपूर्ण वर्ष नाट्य व्यवसायाने मोठा फटका खाल्ला आहे. आता कोरोना पुन्हा डोके वर काढत असला, तरी नाट्यगृहे पूर्णतः बंद होतील असे मला वाटत नाही. सध्या ५० टक्के प्रेक्षक क्षमतेने नाट्यगृहे सुरू आहेत, ही दिलासा देणारी बाब आहे. - गोपाळ अलगेरी (नाट्यनिर्माते) सरकार टाेकाचा निर्णय घेणार नाही, ही अपेक्षा पुन्हा लॉकडाऊन लागेल असे वाटत नाही, कारण सरकार समंजस आहे. आधीच ५० टक्के प्रेक्षक क्षमतेने नाट्यगृहे सुरू आहेत आणि त्यातच नाट्यगृहे बंद झाली; तर स्थिती खूपच गंभीर होईल. लॉकडाऊनच्या इतका टोकाचा निर्णय घेतला जाणार नाही, अशी आशा आहे. - शीतल तळपदे (प्रकाशयोजनाकार) परिस्थिती फारच कठीण हाेईलआता पुन्हा लॉकडाऊन करू नये, असेच माझे सांगणे आहे. नाट्य व्यवसायाने आधीच खूप सहन केले आहे आणि आता पुन्हा नाटक बंद झाले, तर आम्ही कलाकारच नव्हे; तर पडद्यामागच्या कर्मचाऱ्यांची स्थितीही पुन्हा बिकट होईल. आत्ता कुठे नाटकाची गाडी रुळावर येऊ लागली आहे आणि ती पुन्हा बंद पडली तर फारच कठीण परिस्थिती निर्माण होईल. - वंदना गुप्ते (अभिनेत्री)
Coronavirus in Maharashtra : नाट्यगृहांवर पडदा पडल्यास नाट्य व्यवसायाची ‘शंभरी’ भरणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 4:39 AM