मुंबई : गेल्या पंधरा दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबरच्या पंधरवड्यात एकूण १ हजार ३०५ रुग्णांची नोंद झाली आहे. या कालावधीत सरासरी दहा रुग्ण प्रत्येक दिवशी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या कालावधीत मुंबईतील कोरोना रुग्ण ३१ टक्क्यांनी वाढले आहे. मात्र राज्यातील काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये संसर्गात वाढ दिसत असून, अन्यत्र स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर उपनगरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली आहे. दरम्यान, कुणीही कोरोनाविषयक नियमावलींचे पालन करताना दिसत नाही, शिवाय मास्कही घालत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. याविषयी, राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले, सामान्यांनी कोरोनाचे नियम पाळायला हवे. तसेच सरकारच्या नियमांनुसार लसीकरण पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे. अनेकदा अतिजोखमीच्या गटातील सहव्याधीग्रस्त, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती या प्रकारच्या संसर्गास लवकर बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. अशा व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना अधिक दक्षता घेतली पाहिजे.
तपासणीवर लक्ष केंद्रित कोविड संसर्गामध्ये किंचित वाढ होण्याची अपेक्षा होती. ज्यामुळे त्यांनी इन्फ्लुएंझा आजार आणि गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (सारी) असलेल्या रुग्णांची तपासणी सुरू केली आहे. ज्यात चाचणी, ट्रेसिंग आणि उपचार यावर लक्ष केंद्रित केले गेले. सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना त्रिसूत्री सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. संशयित कोविड किंवा आयएलआय आणि सारी रुग्णांचा शोध घेण्याचे आणि पॉझिटिव्ह नमुने गोळा करून जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.