मुंबई - राज्यात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेले १० रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ८ रुग्ण हे पुण्यातील तर दोन मुंबईतील आहेत. राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर नजर ठेवून आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘’राज्यात आतापर्यंत कोरोनाचे १० रुग्ण आढळले आहेत. पैकी ८ पुण्यातील तर दोन मुंबईतील आहे. मात्र यापैकी कुठल्याही रुग्णाची प्रकृती ही गंभीर नाही. काही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.’’
आज झालेल्या बैठकीत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. मात्र शाळा, कॉलेज बंद ठेवण्याइतपत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही. त्यामुळे सध्यातरी राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरू राहतील. मात्र परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून, गरज पडल्यास त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज येत्या शनिवार किंवा रविवारपर्यंत आटोपते घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे अधिवेशनात असेलेले लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवता येईल, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत आम्ही विविध तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यामधून काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी गर्दी करणे टाळावे, वैयक्तिक स्वच्छता राखावी, तसेच सर्दी खोकला झाला असेल, तर नाकातोंडासमोर रुमाल धरावा. सध्यातरी रेल्वे स्टेशनमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी तातडीच्या तपासणीची गरज नाही, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे, असेही ते म्हणाले.
संबंधित बातम्या
'Corona बाबत अफवा पसरवल्या जाताहेत'; अजितदादा धावले शेतकऱ्यांच्या मदतीला!
corona virus-कोरोनाचा पर्यटनावर परिणाम : देशांतर्गतचे प्रवासही स्थानिकांनी केले रद्द
कोरोनामुळे आयपीएलचे आयोजन प्रेक्षकांविना होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी याबाबत आयपीएलच्या आयोजकांकडून तसा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.