मुंबई: राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १३ हजार ६५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर २१ हजार ७७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज दिवसभरात ३०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्यातील आरोग्य विभागाने दिली आहे.
आजपर्यंत एकूण ५५,२८,८३४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०१ टक्के एवढे झाले आहे. राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या तीन महिन्यात आज प्रथमच ९५ टक्क्यांवर गेले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६२,७१,४८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,१९,२२४ (१६.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,००,०५२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ७,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत देखील गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज ७ ते ११ हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते, त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ८६६ नव्या कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला. १०४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबई सोमवारपासून होणार अनलॉक-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आल्याने मुंबईत आता पुनश्च हरिओम होणार आहे. त्यानुसार बेस्ट बसमध्ये आता शंभर टक्के प्रवासाला परवानगी असणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय क्षेत्राशी निगडित नागरिकच लोकलमधून प्रवास करू शकणार आहेत. तर महिलांना लोकल प्रवासाची बंदी करण्यात आली आहे. तसेच सर्व दुकान, रेस्टॉरंट, खाजगी कार्यालय (५० टक्के उपस्थिती) संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरु राहू शकतात. मात्र मॉल मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृह बंदच राहणार आहेत. सोमवारपासून हा सुधारित नियम लागू होणार आहे.
कोविडचा पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेनुसार राज्य सरकारने जिल्हा आणि शहरांची विभागणी केली आहे. या विभागणीकरुन लॉकडाऊनमध्ये शीतलता करण्यात आली आहे. तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये वैद्यकिय कर्मचारी, काही अत्यावश्यक सेवा तसेच महिलांना लोकल प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली होती. यात बदल करण्याचे अधिकारी स्थानिक आपत्ती निवारण प्राधिकरणाला दिले होते.