मुंबई - दिवसभर वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या बैठका, आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा, पत्रकार परिषदा अशा व्यस्त वेळापत्रकामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची सध्या दमछाक होतेय. मात्र, कोरोनाचं संकट परतवून लावण्यासाठी टोपे मेहनत घेत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बैठका आणि पत्रकार परिषदांमध्ये सातत्याने कोरोनावरच चर्चा करत आहेत. राज्याचे दोन्ही दिग्गज मंत्री कोरोनाच्या प्रादुर्भावासून महाराष्ट्राला वाचण्यासाठी झटत आहेत. मात्र, भाजप नेते आमदार निरंजन डावखरेंनी ट्विट करुन वादाला तोंड फोडले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कामाचं महाराष्ट्रातून कौतुक होतंय. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे राजेश टोपे यांच्या आईवर मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, टोपे यांना आईला भेटायलाही वेळ मिळत नाही. रोजच्या कामातून अवघी काही मिनिटं त्यांना आईसाठी मिळतात. त्यांचा बाकीचा दिवस कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात, उपाययोजनांचा, राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात जातो. मात्र, कौटुंबिक जबाबदारीपेक्षा टोपेंनी राज्याच्या जनतेच्या जबाबदारीला प्राधान्य दिलंय. टोपेंच्या या संवेदनशीलतेचंही कौतुक होत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेलेले आमदार निरंजन डावखरे यांनी ट्विट करुन वादाला तोंड फोडले आहे.
सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही, तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे, असे ट्विट डावखरे यांनी केलंय. डावखरेंच्या या ट्विटचा नेटीझन्सने चांगलाच समाचार घेतलाय. डावखरेंना अर्वाच्य शब्दात काही ट्विटर युजर्संने सुनावले आहे. तर अनेकांनी सभ्य भाषेत, ही वेळ राजकारण करायची नसल्याचं म्हटलंय.