मुंबई : राज्यात लागू करण्यात आलेले कठोर निर्बंध १५ मेपर्यंत वाढवण्यावर मंत्रिमंडळाने एकमताने शिक्कामोर्तब केले आहे. १० दिवस मुदतवाढ द्यावी, असे मत काही मंत्र्यांनी मांडले, पण कोरोनाची सायकल १४ दिवसांची आहे. त्यामुळे १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी. जेणेकरून आहे ती संख्या कमी व्हायला मदत होईल, असे सगळ्यांचे मत पडल्यामुळे हा निर्णय झाला आहे. याचे आदेश ३० एप्रिल रोजी काढले जातील. ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकातच निर्बंध आणखी वाढणार, याविषयीचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर मंत्रिमंडळाच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झाले आहे.
हे जनतेलाही कळू द्या
रेमडेसिविर, ऑक्सिजन, लसीबाबत केंद्र सरकारने काही कंपनी मालकांना महाराष्ट्राला औषधे देऊ नका, असे सज्जड भाषेत सुनावले, असेही काही मंत्र्यांनी बैठकीत सांगितले. जर वस्तुस्थिती अशी असेल ही माहिती मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी जनतेला दिली पाहिजे, असा सूर बैठकीत उमटला. मात्र, पुढे यावर चर्चा झाली नसल्याचे समतजे.
गर्दीमुळे चिंता
महाराष्ट्रात लॉकडाऊन म्हणावा तेवढा कठोरपणे पाळला जात नाही, असे अनेक जिल्ह्यात दिसत आहे. सकाळच्या वेळी भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी काळजी निर्माण करत आहे. त्यामुळे आहे तो लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढवा, शिवाय तो आणखी कठोरपणे अंमलात आणा, अशा सूचना एकमताने सर्व मंत्र्यांनी दिल्या. पोलिसांनी थोडा संयम कमी करून मोकाट फिरणाऱ्यांना बंधने आणली पाहिजेत. जाब विचारला पाहिजे, अशा सूचनाही काही मंत्र्यांनी केल्या.