Join us

Coronavirus In Maharashtra: राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका कायम; निर्बंध कायम ठेवावे लागतील, कोरोना टास्क फोर्सचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 6:22 AM

दुसरी लाट ओसरण्यासाठी निर्बंध कायम ठेवावे लागतील, कोरोना टास्क फोर्सचे मत

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाची दुसरी लाट स्थिरावताना दिसत आहे. म्हणजेच राज्यात आणि मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्यूंचे प्रमाण कमी होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरवड्यात दुसऱ्या लाटेच्या संसर्गाची तीव्रता नियंत्रित होईल, परंतु त्यासाठी कठोर निर्बंध कायम ठेवावे लागतील. अन्यथा कमी काळात राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका संभवेल, असा सल्ला राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

राज्यात सलग काही दिवस दैनंदिन रुग्णसंख्या ६६ ते ६७ हजारांच्या टप्प्यात नोंद होत होती. मात्र सोमवार यात घट होऊन ही रुग्णसंख्या ४८ हजारांवर आली. त्याचप्रमाणे, मुंबईत सलग ८ ते ९ हजारांच्या टप्प्यात असलेले रोजचे रुग्ण निदान मागील २-३ दिवसांत तीन ते पाच हजारांवर आले आहेत. तसेच, हळूहळू मृत्यूंचा आकडाही घसरताना दिसतोय, मात्र यातील तफावत दिसेपर्यंत १०-१५ दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.

राज्यात तिसऱ्या कोरोना लाटेची भीती कायम असून त्यापूर्वी दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी निर्बंध कायम ठेवून सामान्यांना कोरोनाविषयक नियमांविषयी जागरूक करणे गरजेचे आहे. पहिल्या लाटेनंतरही कोरोनाविषयक नियमांबद्दल वाढलेली बेफिकिरी, मानसिकतेमुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा घट्ट झाला होता. त्यामुळे संसर्गाची ही तीव्रता लक्षात घेऊन यंत्रणांनीही दक्ष राहणे गरजेचे आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे मत राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी मांडले.

लसीकरण मोहिमेला वेग देणे महत्त्वाचे

काेरोनाला मात देण्यासाठी लस हाच सध्या पर्याय आहे. हर्ड इम्युनिटी लसीच्या माध्यमातून शक्य आहे. वेगवान लसीकरणासाठी व्यवस्थेचे विकेंद्रीकरण, कोरोनाने युवक पिढी बाधित होत असल्याने १८ वयावरील सर्वांना १ मेपासून लसीकरण, तसेच लस उत्पादक कंपन्यांना मदतीचा हात असे अनेक निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने कोरोनाविरोधातील लढाईला धार येणार आहे. कोरोनाच्या छायेने धास्तावलेल्यांना त्यामुळे दिलासा मिळू शकेल.

हर्ड इम्युनिटीपासून दूरच

राज्यात किंवा मुंबईत ज्या वेळेस बाधितांचे प्रमाण ९० टक्क्यांवर जाईल, त्यानंतर सामान्यांमध्ये हर्ड इम्युनिटी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य किंवा मुंबई हर्ड इम्युनिटी (सामूहिक रोगप्रतिकारकशक्ती) पासून दूरच आहे. कोरोनाविरोधात लढण्याची रोगप्रतिकारक क्षमता असल्यास एक तर बचावात्मक प्रभाव निर्माण होऊ शकतो, परंतु आपल्याकडे ही परिस्थिती नसून यावर अवलंबून राहणे चुकीचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, हर्ड इम्युनिटीची अपेक्षा करायला नको. आपण अद्यापही विषाणूचा संसर्ग रोखता येईल, अशा स्थितीच्या जवळपासही नाही. त्यामुळे हर्ड इम्युनिटीची परिस्थिती अद्याप आली नाही.

हर्ड इम्युनिटी म्हणजे काय?

हर्ड इम्युनिटी ही कुठलीही वैद्यकीय प्रक्रिया नाही. जर कुठलाही संसर्गजन्य आजार पसरला तर लोकसंख्येतील एक भाग त्या आजाराविरोधात लढण्याची प्रतिकारकशक्ती मिळवतो. त्यामुळे एक ठरावीक लोकसंख्या संसर्गजन्य आजारापासून मुक्त राहते.  साधारणपणे हर्ड इम्युनिटी हा शब्द लसीकरणाच्या संदर्भात वापरतात. मात्र हर्ड इम्युनिटी ही अधिकाधिक लोकांना संसर्ग होऊन त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारकशक्ती विकसित झाल्यावरच मिळू शकते.  त्यामुळे एका मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्यावर ते इतरांपर्यंत संसर्ग पोहोचवू शकत नाहीत. म्हणजेच संसर्गाची साखळी तोडली जाते.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या