Coronavirus in Maharashtra : जेथे रुग्णसंख्या अधिक; तेथे निर्बंध कडक लागू करा, सर्व स्तरातून मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 07:05 AM2021-04-02T07:05:21+5:302021-04-02T07:06:13+5:30
Coronavirus in Maharashtra: राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे लसीकरणही वेगाने सुरू आहे. अर्थचक्र थांबू नये म्हणून सरसकट लॉकडाऊन न करता ज्या शहरांत रुग्णसंख्या वाढत आहे, तिथे कडक निर्बंध लागू करण्याची मागणी सर्वस्तरातून पुढे येत आहे.
मुंबई : राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यास भाजपसह महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी या घटक पक्षांनी विरोध केला आहे. प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यासह अनेक उद्योजक, व्यापारी व व्यावसायिकांनी तसेच हॉटेल व्यावसायिकांच्या ‘आहार’ संघटनेने लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही लॉकडाऊनच्या विराेधात आहेत.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे लसीकरणही वेगाने सुरू आहे. अर्थचक्र थांबू नये म्हणून सरसकट लॉकडाऊन न करता ज्या शहरांत रुग्णसंख्या वाढत आहे, तिथे कडक निर्बंध लागू करण्याची मागणी सर्वस्तरातून पुढे येत आहे. संपूर्ण लॉकडाऊन केला तर गोरगरीब आणि मजुरांचे हाल होतील. मागील लॉकडाऊनमध्ये शहरांमधील लाखो मजूरांवर स्थलांतरीत होण्याची पाळी आली होती. तशीच स्थिती पुन्हा उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लॉकडाऊनला मोठ्या प्रमाणावर होणारा हा विरोध पाहता त्या-त्या शहरांमधील रुग्णसंख्या पाहून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
मुंबईसह ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, त्या ठिकाणची हॉटेल्स बंद ठेवली जातील. मात्र हॉटेल्सना होम डिलिव्हरी किंवा ‘टेक अवे’ची परवानगी असेल. शॉपिंग मॉल्स १५ दिवसांसाठी बंद ठेवले जाऊ शकतात. खासगी आस्थापनांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सक्ती केली जाईल; मात्र प्रसिद्धीमाध्यमांना यामधून वगळण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
केवळ मास्क लावल्याचा देखावा करू नका, नाक आणि तोंड नीट झाकले जाईल, याची काळजी घ्या. हात धुवत रहा.
डॉ. निवेदिता गुप्ता, वरिष्ठ शास्त्रज्ञ, आयसीएमआर.