मुंबई - कोरोनाविरोधात भारत लढत आहे. कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी बंद आहे. याच दरम्यान एका महिलेला ऑनलाईन जेवण मागवणं महागात पडलं आहे.
लॉकडाऊन असल्यामुळे एका हॉटेलमधून ऑनलाईन जेवण मागवणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. यामुळे महिलेला तब्बल 50 हजारांचा फटका बसल्याची माहिती मिळत आहे. 50 हजारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये ही घटना घडली आहे. एका 49 वर्षीय महिलेने सोशल मीडियावर एका हॉटेलची जाहिरात पाहिली होती. त्यानंतर तिने या जाहिरातमधील क्रमांकावर फोन लावून जेवणाची ऑर्डर घेण्यास सांगितले.
हॉटेलच्या कर्मचाऱ्याने एक लिंक पाठवतो त्यावर नाव, पत्त्यासह तुमची डिटेल्स भरा असं महिलेला सांगितलं. हॉटेलच्या कर्मचाऱ्याने पुढच्यावेळी तुम्ही ऑर्डर केल्यास आम्हाला तुमचं नाव विचारण्याची गरज पडणार नाही आणि काही मिनिटांत जेवणाची ऑर्डर मिळेल असं महिलेला सांगितलं. महिलेने देण्यात आलेली लिंक ओपन केल्यावर तिला डेबिट कार्डची माहिती विचारण्यात आली. महिलेने ही संपूर्ण माहिती भरली. त्यानंतर हॉटेलमधून पुन्हा फोन आला आणि तुमच्याकडे एक चार अंकी नंबर कन्फर्मेशनसाठी येईल म्हणून सांगितलं.
नंबर भरल्यानंतर काय काय ऑर्डर पाहिजे ते सांगा असं सांगितलं. महिला काय काय ऑर्डर करायचं याची लिस्ट करत असताना तिला फोनवर एकामागोमाग एक असे पाच मेसेज आले. त्यामध्ये तिच्या खात्यातून 49 हजार 954 रुपये काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या सर्व प्रकारानंतर आपली फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं आणि तिने पोलिसांत धाव घेतली. याबाबत महिलेने तक्रार केली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : भाषणाआधी पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट, म्हणाले...
Coronavirus : 'देशाला स्मार्ट उपायांची गरज', राहुल गांधींचा मोदींना सल्ला