Coronavirus: ‘मानसमैत्र’ ने दिला ज्येष्ठांसह तरुणाईला भावनिक आधार; बळीराजासह, स्थंलातरित विद्यार्थ्यांशीही संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 06:51 PM2020-04-12T18:51:10+5:302020-04-12T18:52:05+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनच्या समितीतर्फे मानसिक आरोग्य हा विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे.
स्नेहा मोरे
मुंबई - कोरोनाच्या जगभर पसरलेल्या आजारामुळे आणीबाणीची स्थिती उद्भवली आहे. मानवी जीवनशैलीवर या कोरोनाच्या साथीने विविधांगी परिणाम केले आहेत. यामुळे माणसांच्या मानसिक आरोग्यावर होणारा विपरित परिणाम टाळण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मानसमैत्र हेल्पलाइन सुरु केली होती. या हेल्पलाइनला राज्यभरातून ज्येष्ठांसह तरुणाईने भावनिक आधारासाठी काॅल्स केले आहेत. याखेरीज, बळीराजापासून ते स्थलांतरित विद्यार्थ्यांनाही या हेल्पलाईन आधार देऊन दिलासा दिला आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनच्या समितीतर्फे मानसिक आरोग्य हा विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. या विभागामार्फत मानसमैत्र ही हेल्पलाईन कोरोनाच्या काळात सामान्यांना भावनिक व मानसिक आधार देण्याचे काम करत आहे. या हेल्पलाईनवर येणाऱ्या काॅल्स संदर्भात माहिती देताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विनायक साळवे यांनी सांगितले, साधारण दिवसाला ४० काॅल्स येत आहेत. मुंबई, पुणे यासाराख्या शहरातून सर्वाधिक काॅल्स येत आहेत. यात तरुण व ज्येष्ठांचे प्रमाण अधिक आहे. तसेच, महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या काॅल्सचे प्रमाण जास्त आहे. यात तरुणांमध्ये प्रेमभंगामुळे येणारे नैराश्य- चिंता अशा तक्रारी आहे. तर वृद्धांमध्ये मुलांची चिंतेची समस्या अधिक भेडसावत असल्याचे दिसून आले आहे.
स्थलांतरित विद्यार्थ्यांनीही या हेल्पलाईनवर काॅल्स केले असून यांच्यातील काही जणांचे घर-पालक बिहार, मध्यप्रदेशमध्ये आहेत. कोरोनामुळे शिक्षण-रोजगार सर्वच थांबल्याने हे विद्यार्थी चिंतेत आहेत. त्यांच्याशी मानसमित्रांनी संवाद साधून समजूत काढून मनमोकळा संवाद साधला आहे. याखेरीज, परराज्यांतून म्हणजे सुरत, दिल्लीतून काही महिलांचे काॅल्स आले असून त्यांनी या सर्व परिस्थितीमुळे भीती वाटत असल्याचे सांगितले आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून आपण उपचार करत नाही, मात्र आधार मागणाऱ्या प्रत्येकासाठी खंबीरपणे उभे राहतो. त्यांच ऐकून घेऊन त्यावर मार्ग काढायचा प्रयत्न करत असल्याचे साळवे यांनी सांगितले.
नातवांपासून ताटातूट झाल्याने नैराश्य
पुणे येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा हेल्पलाईनवर काॅल आला होता. त्यांनी सांगितले, कोरोनामुळे त्यांच्या मुलाने नातवांपासून दूर लोटल्यामुळे एकटेपणा वाढत आहे. यातून नैराश्य येण्याची भीती आहे, सध्या पुण्यातील घरात एकटेच राहत असल्याने ही एकटेपणाची भीती दिवसागणिक वाढतेय. यानंतर मानसमित्राने त्यांच्याशी संवाद साधला अन् त्यांना आधार दिला.
कापूस पडून आहे करु काय ? हवालदिल शेतकऱ्याची व्यथा
सातारा कोरेगाव येथील शेतकऱ्याने हेल्पलाईनवर काॅल करुन सांगितले, कापसाचा शेतमाल घरात पडून आहे. या कोरोनामुळ शेतमालाचं नुकसान व्हतयं. घाम गाळून जमीन कसलीयं, आता काय करुं इतका शेतमाल घरात पडून आहे, अर्ध्या शेतमालाचं रानडुकरांनी नुकसान केलयं, आम्ही जगावं कसं, न्याय कुणाकडे मागावा या शब्दांत व्यथा सांगितल्याने या बळीराजाला धीर देण्यात आला. त्याच्याशी रोज काही वेळ संवाद साधून त्याची चिंता कमी कऱण्याचा प्रयत्न केला. सकारात्मकता टिकून राहावी यासाठी सातत्याने संवाद साधून त्याला मानसिक बळ दिले.