Join us

CoronaVirus News : मास्क न लावणाऱ्या १८,११८ नागरिकांवर कारवाई, 6 महिन्यांत तब्बल 60 लाखांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2020 8:20 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: मास्क लावणे महापालिकेने एप्रिलपासून अनिवार्य केले आहे. अन्यथा दोनशे रुपये दंड वसूल करण्यात येतो.

मुंबई - तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टंसिंग हेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाय ठरत आहेत. मात्र अनेक ठिकाणी नागरिक असहकार पुकारल्याप्रमाणे मास्क न लावता फिरत आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी 'मास्क नाही तर प्रवेश नाही', असा नियम महापालिकेने केला आहे. त्यानंतरही मास्क न लावणारे तब्बल १०८१ नागरिक गुरुवारी दिवसभरात महापालिकेच्या पथकाला आढळून आले. एप्रिलपासून १ ऑक्टोबरपर्यंत १८ हजार ११८ लोकांकडून ६० लाख ४८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मास्क लावणे महापालिकेने एप्रिलपासून अनिवार्य केले आहे. अन्यथा दोनशे रुपये दंड वसूल करण्यात येतो. काही ठिकाणी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. मात्र अनेक ठिकाणी मास्क न लावून अथवा चुकीच्या पद्धतीने मास्क लावून सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व कार्यालये, आस्‍थापना, मॉल्‍स, सोसायटी, सभागृह आदी ठिकाणी मास्क न लावणाऱ्या लोकांना प्रवेश देऊ नये, असा नियम महापालिकेने केला आहे. 

त्यानुसार बेस्ट बस व रिक्षा - टॅक्सीमध्ये मास्क न लावणाऱ्या प्रवाशांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. एप्रिल महिन्यापासून १२ सप्टेंबरपर्यंत मास्क न लावणाऱ्या लोकांकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल केला जात होता. या कालावधीत ४९९१ लोकांकडून ३३ लाख ६८ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. १३ सप्टेंबरपासून दंडाची रक्कम कमी करून दोनशे रुपये करण्यात आली. त्यानंतर कारवाई तीव्र करण्यात आल्याने गेल्या १९ दिवसांमध्ये १३१२७ लोकांकडून २६ लाख ७९ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. 

कालावधी                                                   प्रकरण     दंडाची रक्कम

एप्रिल ते १२ सप्टेंबर २०२० (एक हजार रुपये)     ४९९१          ३३६८७००

१३ ते ३० सप्टेंबर २०२० (दोनशे रुपये)                १२०४६        २४६३६००

१ ऑक्टोबर २०२०                                             १०८१            २१६२००

एकूण                                                                १८११८           ६०,४८५००

सर्वाधिक कारवाई

विभाग                                प्रकरण        दंडाची रक्कम

आर दक्षिण कांदिवली         १०३७           २०७४००

आर मध्य बोरिवली              ८४५             १६९०००

एम पश्चिम चेंबूर                  ८४४              १५८८००

 

१ ऑक्टोबर रोजी सर्वाधिक कारवाई

जी दक्षिण वरळी, प्रभादेवी     ११४      २२८००

आर दक्षिण कांदिवली            ८७       १७४००

एम पश्चिम   चेंबूर                   ८६        १७२००

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईकोरोना वायरस बातम्या