मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरू असलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमे अंतर्गत महापालिकेचे स्वयंसेवक सात लाख घरांपर्यंत पोहोचले आहेत. आतापर्यंत मुंबईतील २४ लाखांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत प्रत्येक घरातील सदस्याचे तापमान व प्राणवायूची पातळी तपासली जात आहे.
कोरोना बाधित रुग्णांची संख्या १ सप्टेंबरपासून झपाट्याने वाढत गेल्यामुळे राज्यस्तरावर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पालिकेच्या स्वयंसेवकांचे पथक प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदवून घेत आहेत. यामध्ये मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा अशा व्याधींच्या माहितीसह कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे तापमान व प्राणवायूची पातळी नोंदवून घेण्यात येत आहे. प्रत्येक घराचे दोन वेळा सर्वेक्षण केले जाणार आहे.
कोरोनापासून संरक्षणासाठी कोणकोणत्या उपाययोजना आपापल्या स्तरावर अमलात आणाव्यात याची माहितीही यावेळी मुंबईकरांना देण्यात येत आहे. पत्रकाद्वारे प्रत्येक कुटुंबाला कोरोनाबाबत माहिती देण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने २५ ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
- मुंबईत ३५ लाख ४१ हजार ७७५ घर आहेत. यामध्ये एक कोटी ४२ लाख १७ हजार १५८ मुंबईकर वास्तव्यास आहेत. एकूण लोकसंख्येपैकी १७.२३ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
- सर्वेक्षण करण्यासाठी पालिकेच्या पाच हजारजणांचे पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक चमूत तीन स्वयंसेवक कार्यरत आहेत. प्रत्येक पथक दररोज साधारणपणे ५० कुटुंबियांचे सर्वेक्षण करीत आहेत.
- आतापर्यंत सात लाख दोन हजार ४४७ घरांमधील म्हणजेच १९.८३ टक्के घरांमधील २४ लाख ४९ हजार १२८ सदस्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
- बी - डोंगरीत सर्वाधिक ३७.१२ टक्के घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. एल - कुर्ला - ३३.६९ टक्के व सी - भुलेश्वर, चिराबाजार येथे २८.६९ टक्के कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.