CoronaVirus News: विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोना, अधिवेशनाच्या तोंडावर खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 01:11 PM2020-07-22T13:11:24+5:302020-07-22T13:33:03+5:30
सध्या या स्वीय सहाय्यकांवर तसेच त्यांच्या जवळच्या दोन नातेवाईकांवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईः विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टपासून सुरू करण्याची तयारी होत असताना विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकास कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. सध्या या स्वीय सहाय्यकांवर तसेच त्यांच्या जवळच्या दोन नातेवाईकांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यालय सील करण्याची तयारी सुरू आहे. अधिवेशनाच्या तोंडावर विधानभवनाच्या 50% कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, असा आदेश काढण्यात आला होता. मात्र विधानभवनातील कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या निर्णयावर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने अधिवेशनाच्या पूर्वतयारीला मोठा धक्का बसला आहे.
राज्यात निर्माण झालेल्या कोरोना संकटाच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचं विधिमंडळ पावसाळी अधिवेशन ३ ऑगस्टपर्यंत लांबणीवर पडलं आहे. दरम्यान, या सगळ्या परिस्थितीमध्ये महत्त्वाच्या बाबींसाठी पुरवणी मागण्या मांडायची वेळ आली, तर मध्ये एक दिवसाचं विशेष अधिवेशन देखील बोलवता येईल, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. याआधी पावसाळी अधिवेशन २२ जून रोजी घेण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेला लॉकडाऊन आणि त्यानुसार असलेले प्रवास आणि इतर गोष्टींवरचे निर्बंध या पार्श्वभूमीवर अधिवेशन पुढे ढकलण्यावर विचार सुरू होता. अखेर हे अधिवेशन ३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे अधिवेशन पूर्णवेळ होणार नसून कमी दिवसांचं असेल, असं देखील सांगितलं जात आहे.
दरम्यान, राज्य सरकारने पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याच्या घेतलेल्या या निर्णयाला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन ३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रस्ताव होता, त्याला विरोधी पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा दिल्याचंही फडणवीसांनी सांगितलं होतं.