मुंबई: कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असताना प्रशासनाचा गलथानपणा कारभारदेखील समोर येऊ लागला आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांशेजारीच मृतदेह ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सायन रुग्णालयात घडला होता. यानंतर आता पुन्हा एकदा सायन रुग्णालयातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक कोरोना रुग्ण रुग्णालयाच्या खिडकीतून उडी मारताना दिसत आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.'सायन रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ५ मधील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक कोरोना रुग्ण वॉर्ड/खिडकीतून पळून जाताना दिसत आहे. ३ मे रोजी रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी हा प्रकार घडला. त्याला सुरक्ष रक्षकांनी पकडून परत आणलं. हा तोच वॉर्ड आहे, ज्या वॉर्डमध्ये रुग्णांसोबत मृतदेह ठेवण्यात आले होते. वाह रे ठाकरे सरकार,' अशा शब्दांत किरीट सोमय्यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. कालच सायन रुग्णालयातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. एका वॉर्डमध्ये काही मृतदेह ठेवण्यात आले होते. त्यांच्या शेजारीच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. २४ तासांत त्याचा अहवाल मागवण्यात आल्याचं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं.सायन रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये प्लास्टिकच्या आवरणामध्ये हे मृतदेह लपेटून ठेवले असून, या मृतदेहांशेजारील खाटांवर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर, नर्स फिरत असल्याचे व्हिडीओत दिसते. तासन्तास हे मृतदेह वॉर्डमध्ये पडलेले असल्यानं त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या इतर रुग्ण तसंच नातेवाइकांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा होत आहे. यापूर्वी केईएम, कूपरसारख्या रुग्णालयात असेच कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह पडून असल्याच्या घटना ताज्या असतानाच आता सायन रुग्णालयातही मृतदेह पडून असल्याचा प्रकार समोर आल्याने पालिका रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर पुढील प्रक्रियेत दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.