मुंबई - कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस ८० टक्क्यांहून अधिक मुंबईकरांनी घेतला आहे. त्यामुळे दुसरा डोस प्राधान्याने देण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. मात्र शुक्रवारी शासकीय व महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर पुरुषांना प्रवेश नसेल. स. १०.३० ते सायं. ६.३० या वेळेत केवळ महिलांना लस देण्यात येणार आहे. महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येऊन पहिला किंवा दुसरा डोस घेता येणार आहे. या विशेष सत्रानिमित्त ऑनलाइन पूर्व नोंदणी या काळात बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. १८ वर्षांवरील ९५ लाख लाभार्थ्यांपैकी ७५ लाख ३७ हजार १४१ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. मात्र ३२ लाख नागरिकांनीच आतापर्यंत दोन्ही डोस घेतले आहे. त्यामुळे दुसऱ्या डोसचे प्रमाण वाढविण्यासठी पालिकेने नियोजन केले आहे. त्यानुसार फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी, केवळ दुसऱ्या डोससाठी लसीकरण केंद्र राखून ठेवण्यात आले आहे.
लसीकरण केंद्रावर थेट प्रवेश....
आता एक दिवस महिलांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि सर्व शासकीय व पालिका रुग्णालये आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येऊन महिलांना लस घेता येणार आहे. या प्रयोगामुळे लस घेण्याचे प्रमाण महिलांमध्ये वाढेल, असा विश्वास पालिका प्रशासनाला वाटत आहे.