Join us  

CoronaVirus News: सरकारी रुग्णालयांत सेवा द्या, अन्यथा...; खासगी डॉक्टरांना सरकारचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 10:57 AM

CoronaVirus marathi News and live updates: सरकारी रुग्णालयांत सेवा न दिल्यास राज्य सरकार कठोर कारवाई करणार

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, बाधितांवर उपचार करणाऱ्यांसाठी सरकारी रुग्णालयांमधला कर्मचारी दिवसरात्र झटत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्यानं कर्मचारी वर्गावर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनं खासगी डॉक्टरांसाठी एक महत्त्वाचा आदेश काढला आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी खासगी डॉक्टरांनी पुढे यावं आणि सरकारी रुग्णालयांमध्ये सेवा द्यावी, अशी नोटीस सरकारकडून बजावण्यात आली आहे.मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा दहा हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्यानं वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारी रुग्णालयांमध्ये किमान १५ दिवस सेवा देण्याचे आदेश खासगी डॉक्टरांना देण्यात आले आहेत. सरकारी रुग्णालयांमधल्या कोरोनाबाधितांवर उपचार करण्यास नकार दिल्यास खासगी डॉक्टरांना कठोर कारवाईला सामोरं जावं लावणार आहे. अशा डॉक्टरांचे परवानेदेखील रद्द केले जाऊ शकतात. तसा स्पष्ट इशारा सरकारकडून देण्यात आला आहे. सर्वच खासगी डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयांमध्ये सेवेत रुजु होऊन कोरोना रुग्णांवर उपचार करावेत, असं सरकारनं आदेशात म्हटलं आहे. मुंबईत जवळपास २५ हजारहून अधिक खासगी डॉक्टर आहेत. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी हे डॉक्टर पुढे आल्यास सरकारी रुग्णालयांमधल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होऊ शकतो.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने होत असल्यानं गेल्या कित्येक दिवसांपासून काही डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद केले होतं. संशयितांना तपासण्यासदेखील काही डॉक्टर नकार देत असल्याच्या तक्रारीदेखील समोर आल्या आहेत. आता मात्र या सर्वच डॉक्टरांना सरकारच्या आदेशाचं पालन करावं लागणार आहे. अन्यथा त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई सरकारकडून केली जाऊ शकते.सरकारकडून जारी करण्यात आलेली नोटीस पाहता त्यात ५५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या डॉक्टरांना सूट देण्यात आली आहे. एका फॉर्मच्या माध्यमातून या डॉक्टरांनी त्यांची पात्रता, महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल नोंदणीकृत संस्था, सध्या काम करत असणाऱ्या ठिकाणाची माहिती द्यावी लागेल. त्याशिवाय त्यांना पोस्टींगसाठीचं ठिकाणदेखील निवडता येईल.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या