मुंबई - महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांकडेच बहुतांशी रुग्ण धाव घेत असल्याने असल्याने तेथे ताण वाढत आहे. त्यामुळे सहा उपनगरीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची ६८ पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. येत्या शुक्रवारी व शनिवारी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत या मुलाखती होणार आहेत.
उपनगरीय रुग्णालयांत मुलाखतींद्वारे वरिष्ठ सल्लागार स्तरावरील ३२ पदे, तर कनिष्ठ सल्लागार स्तरावरील ३६ पदे अशी एकूण ६८ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये भेषज्य, शल्यचिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, भूल तज्ज्ञ, विकिरण तज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, नेत्र तज्ज्ञ, रोगनिदान तज्ज्ञ या पदांचा समावेश असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली.
असे आहेत निकष...
कनिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज करणार्याकडे एम. डी. किंवा एम. एस. किंवा डी. एन. बी. अशी शैक्षणिक पात्रता, किमान पाच वर्षांचा कार्यानुभव असावा. वरिष्ठ सल्लागार पदासाठीची शैक्षणिक पात्रता देखील एम. डी. किंवा एम. एस. किंवा डी. एन. बी. अशी असून कार्यानुभव मात्र आठ वर्षांचा असावा. वरिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज करणा-या व्यक्तिने किमान तीन तर कनिष्ठ सल्लागार पदासाठी किमान दोन संशोधन विषयक कामे आवश्यक आहेत. अर्जदाराला मराठी भाषा येणे आवश्यक आहे. निवड होणा-या वरिष्ठ सल्लागारांना दरमहा दोन लाख रुपये, तर कनिष्ठ सल्लागारांना दरमहा दीड लाख मानधन असेल.
हे आणणे आवश्यक...
अर्जदाराने शाळा सोडल्याचा दाखला,जन्म प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेची गुणपत्रिका, वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र.
रूग्णालय...पदे
भाभा (कुर्ला) - ९ पदे
भाभा (वांद्रे) - १०
व्ही. एन. देसाई (सांताक्रुझ) - १०
डॉ. आंबेडकर रुग्णालय (कांदिवली) - १५
शताब्दी रुग्णालय (गोवंडी) - १०
राजावाडी (घाटकोपर) - १४