नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन वाढविला आहे. या लॉकडाऊनमध्ये लाखांहून अधिक मजूर विविध राज्यात अडकले आहेत.
या मजुरांना आपल्या घरी परतण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने नियमावली जारी केली आहे. मात्र, अडकलेल्या या मजूरांकडून घरी जाण्यासाठी प्रवास भाडे आकारण्यात येत आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. यातच अभिनेता रितेश देशमुखने एक मन सुन्न करणारा फोटो ट्विटवर शेअर करत मजुरांना गावी जाण्यासाठी विनामूल्य रेल्वेसेवा दिली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
आपल्या वृद्ध आईला कमरेवर उचलून घेऊन एक मजूर पायी प्रवास करत असल्याचा फोटो रितेश देशमुखने शेअर केला आहे. याचबरोबर तो म्हणाला, "स्थलांतरीत मजुरांचा घरी परतण्याचा खर्च आपण एक देश म्हणूनच घ्यावा. रेल्वेसेवा विनामूल्य दिली पाहिजे. आधीच हे मजूर पगाराविना आहेत. त्यात राहण्यासाठी जागा नाही आणि त्यांना कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती आहे."
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यासंदर्भात गेल्या दोन दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे. लॉकडाऊनच्या अटीशर्थींमध्ये सूट देऊन मजुरांना घरी परतण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विविध राज्यातील सरकाराने आपल्या राज्यातील मजुरांना परत पाठविण्यासाठी काम सुरू केले आहे.
दरम्यान, परराज्यातील मजूर आणि कामगार यांना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या-त्यांच्या घरी जायला मिळत आहे. हे सर्व गरीब असून कोरोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करुन रेल्वेने त्यांच्याकडून तिकीट शुल्क आकारु नये, अशी विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला केली आहे. रविवारी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मंत्रालयातील सचिव, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.