Join us

CoronaVirus in Mumbai: सायन हॉस्पिटलमध्ये मृतदेह आणि कोरोना पेशंट एकाच ठिकाणी, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 11:53 AM

CoronaVirus marathi News सायन रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; नितेश राणेंकडून व्हिडीओ ट्विट

- अतुल कुलकर्णी

मुंबई : मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे रुग्ण आणि मृतदेह एकाच रुममध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे भीषण दृश्य दाखवणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं मुंबईसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या कारभारावरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मुंबईत विविध १० सरकारी हॉस्पिटलमधील शवागारांमध्ये ४४० मृतदेह ठेवण्याची सोय असताना सायन मधील मृतदेह तेथेच ठेवण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची विल्हेवाट कशी लावायची याच्या सूचना केंद्र सरकार व आयसीएमआर यांनी दिलेल्या आहेत. त्या गाईडलाईननुसार राज्य सरकारने देखील स्वत:च्या वेगळ्या सूचना दिल्या आहेत. असे असतानाही सायन हॉस्पिटलमध्ये त्या सूचनांचे पालन झाले नाही. याबद्दल सायन हॉस्पिटलचे डीन प्रमोद इंगळे यांच्या मते मृत कोरोना रुग्णाचे नातेवाईक बॉडी घेऊन जाण्यासाठी लवकर येत नाहीत. येणारे नवे रुग्ण थांबवता येत नाहीत. त्यामुळे काही अंतरावर बॉडीज ठेवल्या जातात. मात्र, हे उत्तर किंवा स्पष्टीकरण अजिबातच पटणारे वाटत नाही.

एका डॉक्टरच्या मते याआधी असाच प्रकार नायर हॉस्पिटलमध्येही घडला होता. त्याठिकाणी देखील ज्या ठिकाणी रुग्णांवर उपचार सुरू होते, त्याच ठिकाणी जवळपास २० मृतदेह ठेवले होते. गुरुवारी यावर आरडाओरड झाल्यामुळे हे मृतदेह हलवण्यात आले. मुंबई महापालिका आणि हॉस्पिटलमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे असे प्रकार सातत्याने घडत आहेत असे सांगितले जात आहे. मुंबईत १० हॉस्पिटल्समध्ये शवागाराची सोय असून त्यात ४४० मृतदेह ठेवण्याची सोय आहे. याआधी मुंबई महापालिकेने पोलिसांच्या मदतीने, कोणीही दावा न केलेले पण पडून असलेले अनेक मृतदेह शवागारातून हलवले होते. त्यामुळे तेथे जागा नव्हती असेही नव्हते. याबद्दल डॉ. एस.एम. पाटील म्हणाले, आमच्याकडे रोजच्या रोज मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे जागा नाही असे म्हणणे चुकीचे आहे.

कोठे किती मृतदेह ठेवण्याची सोय?- नायर हॉस्पिटल - ३०- सायन हॉस्पिटल - ४७- केईएम हॉस्पिटल - ४५ - सेंट जॉर्ज हॉस्पिटल - ५ - जीटी हॉस्पिटल - ५- जे जे हॉस्पिटल - १२६- राजावाडी हॉस्पिटल - ४५- कूपर हॉस्पिटल - ५४- सिद्धार्थ हॉस्पिटल गोरेगाव - २८- भगवती हॉस्पिटल बोरिवली - ५५

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यानीतेश राणे