मुंबई - कोरोनाचा कहर पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे, यात राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे, या बैठकीत राज्यात अंशत: लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारने काही दिवसांपूर्वी रात्रीच्या जमावबंदीचे आदेश दिले होते, परंतु अद्यापही अनेक ठिकाणी लोकांची गर्दी होताना दिसत आहे, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि सरकारी पातळीवर मोठ्या हालचाली वाढल्या आहेत, दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. याच दरम्यान आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंबईलोकलबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुंबई लोकलबाबतविजय वडेट्टीवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं आहे. लॉकडाऊन सामान्य जनतेला परवडणार नाही. निर्बंध लागतील पण लॉकडाऊन नाही. मुंबई लोकल बंद होणार नाही असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. गर्दी कशी कमी होईल यावर भर दिला जाईल. लॉकडाऊन जरी नसला तरी निर्बंध अधिक कडक केले जातील. लोकल प्रवाशांची विभागणी करण्यात येईल. लोकल बंद होणार नाही पण निर्बंध लागतील असं देखील म्हटलं आहे. गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ कोरोनाबाधित आढळले, तर २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत सध्याच्या घडीला राज्यात ३ लाख ६६ हजार ५३३ सक्रीय रुग्ण आहे.
मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे, मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल फक्त अत्यावश्यक सेवेसाठी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात अंशत: लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यानुसार ज्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, त्या ठिकाणी मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह आणि खासगी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन केला जाण्याची शक्यता कमी आहे परंतु यातून मध्यममार्ग काय काढता येईल यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या, तर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांसोबत बैठका सुरू आहेत.
महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचं हे संकट असतानाच आता राज्यासमोर अजून एक संकट उभं राहिलं आहे. मुंबईसह राज्यात पुढील 5 ते 6 दिवस पुरेल एवढाचा रक्ताचा साठा (Blood) शिल्लक असल्याची आता माहिती मिळत आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांनी दिली आहे. यासोबतच त्यांनी नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचं आवाहनही देखील केलं आहे.
राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईसह राज्यातील रक्तसाठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर याबाबत माहिती दिली आहे. "मुंबईसह राज्यात पुढील 5 ते 6 दिवस पुरेल एवढा तर जास्तीत जास्त दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महत्त्वाच्या शस्त्रक्रियांवेळी रुग्णांना रक्ताची अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावं. रुग्णालये आणि विविध सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेत रक्तदान शिबिरे आयोजित करावीत" असं आवाहन शिंगणे यांनी केलं आहे.