Join us

Coronavirus : कोरोनाच्या धसक्यामुळे विवाह सोहळे स्थगित, इतर मोठे कार्यक्रमही पुढे ढकलले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 4:03 AM

कोरोनाला थोपविण्यासाठी मुंबईतील बहुतांश कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असून, आता विवाह सोहळ्यासह उर्वरित मोठे सोहळेही स्थगित करण्यात आले आहेत.

मुंबई  - कोरोनाने जगभर प्रादुर्भाव माजविला असतानाच त्यातून मुंबईदेखील सुटलेली नाही. कोरोनाला थोपविण्यासाठी मुंबईतील बहुतांश कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असून, आता विवाह सोहळ्यासह  उर्वरित मोठे सोहळेही स्थगित करण्यात आले आहेत. पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील एका कुटुंबाने आपल्या घरातील विवाह सोहळा खबरदारीचा उपाय म्हणून स्थगित केला असून, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला की याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.हॉलचालक, कॅटरर्स, मंडप आणि डेकोरेशनकडील माहितीनुसार, विवाह सोहळ्यासाठी बुक करण्यात आलेले हॉल रद्द करण्यात येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हॉल रद्द केल्यानंतर हॉलचालकाकडून पैसेही परत केले जात आहेत. कारण सरकारनेच तसे आदेश दिले आहेत. मुळात हे विवाह सोहळे स्वत:हून कोणीही मोडलेले नाहीत, तर कोरोनामुळे स्थगित करण्यात येत आहेत आणि पुढे ढकलण्यात येत आहेत. दुसरीकडे कॅटरर्सचा विचार करता, हे मात्र रद्द केले जात नाहीत. कारण पुढच्या वेळी संबंधितांनाच जेवणाची आॅर्डर दिली जाईल, असे सांगितले जात आहे. मात्र, उद्यावर असलेले विवाह स्थगित करण्यात आल्याने मंडप, डेकोरेशनचे पैसे मात्र अदा करावे लागत आहेत. कारण मंडप अथवा डेकोरेशनधारकांचे नुकसान होऊ नये, असाही विचार माणुसकीच्या नात्यातून केला जात आहे.विक्रोळी येथील शिवसेनेच्या शाखाप्रमुख प्रिया गावडे यांनी सांगितले की, माटुंगा येथे विवाह सोहळा संपन्न होणार होता. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून सोहळा स्थगित करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर सरकारच्या भूमिकेनुसार याबाबतचा निर्णय घेतला जाईल. सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रोहीदास समाज पंचायत संघाचे अध्यक्ष मयूर देवळेकर यांनीही आयोजित सोहळे स्थगित करण्यात आल्याची माहिती दिली. दरम्यान, मार्च-एप्रिलमध्ये स्थगित झालेले विवाह पुढील महिन्यात करता येतील. त्यामुळे विवाह मुहूर्ताची चिंता करण्याचे कारण नाही, असे पंचांगकर्त्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :लग्नमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई