Join us

coronavirus: अत्यावश्यक यादीतून मास्क, सॅनिटायझर वगळल्याने दरवाढ, औषधविक्रेत्यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 2:14 AM

राज्यात मास्क आणि सॅनिटायझरचा पुरेसा साठा असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) स्पष्ट केले. मागणीपेक्षा साठा अधिक असून, उत्पादक आणि विक्रेते कमी किंमत लावत आहेत.

मुंबई : कोरोनाबाधितांच्या संख्येत सतत वाढ होत असताना मास्क आणि सॅनिटायझर यांना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात आले आहे. देशभरात मास्क आणि सॅनिटायझरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे कारण देत, ही दोन्ही साधने अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्याचे आदेश केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने दिले आहेत. त्यामुळे किमतीवर कोणतेही नियंत्रण राहणार नसल्याने मास्क आणि सॅनिटायझर पुन्हा महाग होण्याची शक्यता आहे. येत्या काळात या महागाईचा सामना सामान्यांना करावा लागणार आहे.दरम्यान, राज्यात मास्क आणि सॅनिटायझरचा पुरेसा साठा असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) स्पष्ट केले. मागणीपेक्षा साठा अधिक असून, उत्पादक आणि विक्रेते कमी किंमत लावत आहेत. १५ ते २० दिवसांपूर्वी मास्क आणि सॅनिटायझरबाबतीत माहिती मागवली होती. त्यानुसार राज्यात मास्क आणि सॅनिटायझरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.साथीचा उद्रेक सुरू असताना अत्यावश्यक यादीतून या गोष्टी वगळण्याची घाई करणे, न्यायालयामध्ये यावर सुनावणी सुरू असताना अचानक निर्णय घेणे या बाबी शंकास्पद आहेत. यामुळे पुन्हा किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी व्यक्त केले, त्यामुळे या निर्णयाला आरोग्य क्षेत्रातून विरोध केला जात आहे.कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरही कोणत्याही किमतीत मास्क व सॅनिटायझरची विक्री केली जात होती. बऱ्याच प्रकरणात निकृष्ट दर्जाचे मास्क व सॅनिटायझरही यात दिसून आले. त्यामुळे ही साथ अजूनही असताना किमतीवरील नियंत्रण नसणे ही सामान्यांचा जीव धोक्यात घालणार आहे, असे मत दादर येथील औषध विक्रेते राजेश जैन यांनी सांगितले. याखेरीज, राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाच्या वतीने या वस्तूंवरील दर नियंत्रणासाठी कठोर निर्देश देणे आवश्यक होते. परंतु, प्राधिकरÞणाच्या वतीने कोणतीही ठोस पावले उचलताना दिसत नसल्याने सामान्यांना याचा आर्थिक भार सहन करावा लागणार असल्याचे फोर्ट येथील औषध विक्रेते कमल शहा यांनी सांगितले.राज्यात आहे पुरेसा साठा उपलब्ध1 १५ ते २० दिवसांपूर्वी मास्क आणि सॅनिटायझरबाबतीत माहिती मागवली होती. राज्यात पुरेसा साठा उपलब्ध आहे.2मास्क, सॅनिटायझरच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत व्यक्त केले जाते.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईवैद्यकीय