coronavirus: संतापजनक! मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट्स देणार नाही, केंद्राचे महाराष्ट्राला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 11:04 AM2020-09-07T11:04:09+5:302020-09-07T11:12:58+5:30
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आण्यासाठी राज्य सरकारला केंद्राकडून मदतीची अपेक्षा असताना केंद्र सरकारकडून आलेल्या एका पत्रामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रातही मिशन अनलॉक सुरू असतानाच मो्ठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित समोर येत आहेत. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आण्यासाठी राज्य सरकारला केंद्राकडून मदतीची अपेक्षा असताना केंद्र सरकारकडून आलेल्या एका पत्रामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आणि रुग्णांवर उपचारांसाठी आवश्यक असलेले मास्क, व्हेंटिलेटर आणि पीपीई किट्स महाराष्ट्राला देण्यात येणार नाहीत, असे पत्र केंद्रातून आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच या प्रकाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या पत्राबाबत आपले केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बोलणे झाले आहे. आता आपण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहोत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान, सप्टेंबरच्या सुरुवातीपासून राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक झाली आहे. राज्यात दिवसभरात तब्बल २३ हजार ३५० रुग्ण आणि ३२८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णनोंद आहे. परिणामी, राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९ लाख ७ हजार २१२ झाली असून बळींची संख्या २६ हजार ६०४ झाली आहे. प्रवासावरील जिल्हा बंदीची बंधने हटवण्यात आल्याने तसेच कार्यालयांमधील उपस्थिती वाढवण्यात आल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मास्क वापरणे अनिवार्य केल्यानंतरही लोक मास्क वापरत नाही आहेत, असे सांगत टोपे यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी १५ सप्टेंबरपासून राज्यात स्वस्थ महाराष्ट्र मोहीम राबवण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर दिला जाणार आहे, असेही टोपे यांनी सांगितले.
अनलॉक सुरू होताच रुग्णसंख्या वाढली
राज्यात मार्च महिन्यात झालेला कोरोनाचा उद्रेक पाच महिन्यांनंतर ऑगस्ट महिन्यात नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक चित्र होते. मात्र सप्टेंबरच्या पहिल्या सहा दिवसांत राज्यातील रुग्णांमध्ये तब्बल १ लाखाहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली आहे. १ ते ६ सप्टेंबर या काळात राज्यात १ लाख १४ हजार ३६० रुग्ण नोंद झाली आहे. अनलॉकचा टप्पा आणि नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे.
पुण्याची स्थिती गंभीर, ६१ हजार सक्रिय रुग्णांवर उपचार
राज्यात सर्वाधिक दैनंदिन रुग्ण नोंद पुण्यात ३ हजार ८०० एवढी झाली आहे. परिणामी एकूण बाधितांची संख्या १ लाख ९९ हजार ३०३ वर पोहोचली असून एकूण मृत्यू ४ हजार ४२९ झाले आहेत. १ लाख ३३ हजार ४९१ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या ६१ हजार ३८३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे
म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड
…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा
५०० ट्रेन आणि १० हजार स्टॉप बंद होणार? रेल्वे तयार करतेय नवे वेळापत्रक