Coronavirus: “कदाचित ही अखेरची शुभसकाळ...”; कोरोनानं निधनापूर्वी महिला डॉक्टरची FB पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 12:53 PM2021-04-21T12:53:55+5:302021-04-21T12:55:33+5:30
शिवडी क्षयरोग रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा जाधव यांचं सोमवारी कोरोनामुळं निधन झालं.
मुंबई – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात दिवसाला सरासरी ५० हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे. कोरोना काळात आरोग्य सेवा बजावणारे डॉक्टर्स आणि नर्सेस स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना वाचवत आहेत. मात्र यात मुंबईतील एका डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिवडी क्षयरोग रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा जाधव यांचं सोमवारी कोरोनामुळं निधन झालं. त्या ५१ वर्षाच्या होत्या. मागील वर्षभरापासून कोरोना संक्रमणाच्या संघर्षात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते. डॉ. मनिषा जाधव यांची शेवटची फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. यात लिहिलं होतं की, गुडमॉर्निंग कदाचित ही अखेरची शुभ सकाळ असेल. शरीर निघून जाते मात्र आत्मा कायम राहतो अशा आशयाची फेसबुकवर अखेरची पोस्ट शेअर केली होती.
डॉ. मनिषा जाधव यांचे सहकारी असलेले शिवडी रुग्णालयातील दिलीप मकवाना यांनी सांगितले की, मनिषा जाधव यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
"इतकं हतबल, लाचार कधीच वाटलं नाही..."
देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल दीड कोटीच्या वर गेली आहे. कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी सातत्याने समोर येत आहे. देशातील अनेक राज्यात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा अभाव, व्हेंटिलेटर आणि बेड्सची कमतरता, लस आणि रेमडेसिवीरसारख्या तुटवडा निर्माण झाला आहे. डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील सर्च कर्मचारी अहोरात्र कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत.
कोरोनामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती सांगताना मुंबईतील एक तज्ज्ञ डॉक्टरही भावूक झाल्या आहेत. मुंबईतील इन्फीशियस डिसीज फिजीशियन डॉ तृप्ती गिलाडा (Dr. Trupti Gilada) यांनी कोरोनाची भयंकर परिस्थिती सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांचा अश्रूंचा बांध फुटला आहे. कोरोनाचं संकट, रुग्णालयात नेमकी काय परिस्थिती आहे. लोकांनी काय करायला हवं यावर डॉ. तृप्ती गिलाडा यांनी व्हिडीओमध्ये भाष्य केलं आहे. अशी परिस्थिती मी याआधी कधीच पाहिली नाही. आम्ही खूप हतबल आहोत. इतर डॉक्टरांप्रमाणे मीसुद्धा घाबरले आहे. काय करावं ते समजत नाही असं म्हटलं आहे.
"मुंबईची अवस्था खूप खराब आहे. मला इतकं हतबल, लाचार झाल्यासारखं कधीच वाटलं नाही. आम्हाला अनेक रुग्णांना घरीच उपचार द्यावे लागत आहेत. मी तुम्हाला विनंती करते, स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला वाटतं की तुम्हाला वर्षभर कोरोना झाला नाही. म्हणजे तुम्ही सुपरहिरो आहात. तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे पण असं काही नाही. आम्ही अनेक तरुणांना पाहतो आहोत. अगदी ३५ वयातील लोकही व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच एकदा कोरोना झाला म्हणजे पुन्हा होणार नाही असं काही नाही. त्यामुळे काळजी घ्या" असं डॉ. तृप्ती यांनी म्हटलं आहे.