Join us

Coronavirus: कोरोनाने पुन्हा डोके वर काढलं; बूस्टर डोस घेतलेल्यांना सौम्य संसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 2:43 PM

वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती : सेव्हन हिल्स रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत ४ हजार ७६५ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे

मुंबई : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतरही लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशा सूचना वेळोवेळी वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या आहेत. मागील काही दिवसांत शहर, उपनगरातील बूस्टर डोस घेतलेल्या लाभार्थ्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. मात्र, याचे प्रमाण वाढत असले तरीही हा संसर्ग अत्यंत सौम्य असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. 

याविषयी राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, बूस्टर डोसनंतरही संसर्ग होत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. मात्र, या रुग्णांना डोकेदुखी आणि अंगदुखीच्या किरकोळ तक्रारी असल्याचे दिसले. प्रवासानिमित्त या रुग्णांना सातत्याने कोरोना चाचणी करावी लागत असल्याने त्यातून संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.  

सेव्हन हिल्स रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत ४ हजार ७६५ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. त्यापैकी २७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १९ रुग्णांना एका आठवड्यात, चार जणांना आठ दिवसांत, दोघांना नऊ दिवसांत आणि १० दिवसांत दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णांमध्ये १३ जण २२ ते ४० वयोगटातील होते, १० जण ४१ ते ५९ वयोगटातील होते, तर चार जण ज्येष्ठ नागरिक होते. एका डॉक्टरलाही विषाणूची लागण पुन्हा झाली आहे. नागरिक आता मास्क वापरत नाहीत, कोविडचे नियम पाळत नाहीत. यामुळे संसर्ग पसरत आहे. पुन्हा कोविडचा संसर्ग झाल्यास ७ ते १४ दिवस घरीच राहावे लागणार आहे.

लस घेणे आवश्यकच

तिसरी लाट काही ठिकाणी ओसरत असल्याने आता लसीची काय आवश्यकता, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. परंतु तिसरी लाट ओसरली तरी पुन्हा चौथ्या लाटेचे संकेतही तज्ज्ञांनी दिले आहेत. अतिजोखमीच्या गटातील ६० वर्षांवरील, मधुमेह, उच्च रक्तदाब इतर दीर्घकालीन आजारांचे रुग्ण आदींनी लसीची सुरक्षितता न घेतल्यास तीव्रतेने बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली किंवा संसर्गाचा प्रसार आटोक्यात आला तरी तिसऱ्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी लस घेणे अत्यावश्यक आहे.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या