Join us

Coronavirus: नवजात बालकाच्या मदतीला धावले आदित्य ठाकरे; आईने मानले आभार तर सर्वच स्तरातून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 4:41 PM

लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांचे हाल झाले आहेत. अनेकांना घराबाहेर पडता येत नसल्यामुळे आजारी रुग्णांची तारांबळ उडाली आहे.

मुंबई – अवघ्या देशात कोरोनाचं संक्रमण दिवसागणिक वाढत असल्याने सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. १४ एप्रिलला लॉकडाऊन संपणार आहे पण देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊन वाढवण्याची चिन्हे अधिक दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यानंतर लॉकडाऊन वाढवण्याबाबत सरकार विचाराधीन आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांचे हाल झाले आहेत. अनेकांना घराबाहेर पडता येत नसल्यामुळे आजारी रुग्णांची तारांबळ उडाली आहे. अशातच चंद्रपूरच्या एका महिलेच्या नवजात बालकाला घालण्यासाठी कपडेही न मिळाल्याने या आईने थेट ट्विटरच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंपर्यंत मदतीची याचना केली. त्यानंतर अवघ्या २ तासांत चक्र फिरली. युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने या महिलेशी संपर्क साधत स्थानिक पदाधिकाऱ्यांमार्फत या नवजात बालकाला कपडे पोहचवण्याची सोय केली.

लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद आहेत त्यामुळे लहान मुलांची कपड्यांची दुकानेही बंद आहेत. मात्र नवजात बालकाच्या अंगात घालायचे काय? असा प्रश्न आईला पडला. कोरोनाच्या वाढत्या संकटात बाळाला त्रास होऊ नये यासाठी कपडे खरेदी करणे गरजेचे होते. त्यामुळे आई पूनम देशपांडे यांनी आपली समस्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवली. त्यानंतर २ तासात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही समस्या सोडवल्याने आईने लागलीच आदित्य ठाकरे यांचे आभार मानले.

याआधीही आदित्य ठाकरे यांनी वरळी कोळीवाडा परिसरात हार्टच्या पेशंटना राहुल कनाल यांच्यामार्फत औषधे घरपोच पोहचवली होती. त्यानंतर स्वत: या महिलेशी आदित्य ठाकरेंनी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बारामती एमआयडीसीत काम करणाऱ्या बिहारी कामगारांनी थेट बिहारच्या नेत्यांना संपर्क साधला. त्यानंतर बिहारी नेत्यांनी हा विषय शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सांगितला. ठाकरे यांनी त्याची दखल घेत बारामतीच्या शिवसैनिकांना बिहारींना मदत करण्याबाबत सूचना दिल्या.शिवसैनिकांनी तात्काळ धाव देत बिहारी कामगारांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे कोरोना संकटकाळात आदित्य ठाकरेंच्या तत्परतेचं सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.  

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसआदित्य ठाकरे