Join us

Coronavirus : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणे; सरकारच्या चतु:सूत्रीचं पालन करा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 3:38 PM

Coronavirus : सर्वांनी घरीच थांबून या रोगाचा संभाव्य प्रसार थांबविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अतिआवश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यकलाप थांबवण्यात आले आहेत.

मुंबईः सध्या कोरोना विषाणूला नष्ट करण्यासाठी आणि या विषाणूचा फैलाव थांबवण्यासाठी शासन अनेक उपाययोजना करीत आहे. शासन निर्णयाद्वारे ह्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनामार्फत कळवण्यात आल्या आहेत. सर्वांनी घरीच थांबून या रोगाचा संभाव्य प्रसार थांबविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.अतिआवश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यकलाप थांबवण्यात आले आहेत. मात्र असे असतानासुद्धा होम क्वारंटाईन केलेले काही लोक सर्रास घराबाहेर पडून या प्रतिबंधांना हरताळ फासत असल्याचे दृष्टीस पडते आहे. याकरिता सर्व नागरिकांना खालीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.

1. आपणास होम क्वारंटाईन केलेली कोणीही व्यक्ती अशा प्रकारे प्रतिबंध असतांना सुद्धा सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरताना आढळल्यास त्याची माहिती ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांचे मार्फत पोलिसांना द्यावी.2. नागरी भागात नारपालिका मुख्याधिकारी यांनी अशा होम क्वारंटाईन च्या व्यक्तींवर लक्ष ठेवावे व अशा प्रकारे प्रतिबंधांचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर आवश्यक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांना माहिती द्यावी व कारवाई करावी.3. लग्नसमारंभ आणि इतर सोहळे यापासून लोकं दूर राहत असले तरी अंतिम संस्कार व रक्षा विसर्जन अशा कार्यक्रमांना करण्यास गर्दी करत आहेत असे निदर्शनास आले आहे. अशा ठिकाणी सुद्धा संयम बाळगून व परिस्थिती चा विचार करून गर्दी टाळावी व कमीत कमी संख्येत हा संस्कार पाळावा.4. हा आठवडा व यापुढील काही दिवस हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याने आपण या प्रतिबंधात्मक सूचनांचे कठोरपणे पालन करावे.

उपरोक्त चतुसूत्री आपल्या भल्यासाठी असून, कोरोना संदर्भातील आपल्या या युद्धास आपण सहकार्य करून आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी बंधने पाळावीत, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस