मुंबई : राजावाडी रुग्णालयातून बेपत्ता मृतदेह शवागृहातच पडून असल्याची माहिती टिळक नगर पोलिसांच्या चौकशीतून समोर आली. २०१७ मध्ये त्याच्या गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेच्या खुणांवरून त्याची ओळख पटली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी नातेवाईकांसोबत झालेल्या चाकू हल्ल्यात गोवंडीचा तरुण जखमी झाला. त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे रुग्णाची कोरोना चाचणी करणे गरजेचे असल्याने रुग्णालयाने मृतदेह देण्यास नकार दिला. ८ जूनच्या रात्री तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी याबाबत कुटुंबियाना सांगण्यात आले. पण त्याच्या मृतदेह शवागृहात आढळला नाही. त्यामुळे कुटुंबियाच्या तक्रारीवरून टिळक नगर पोलीस ठाण्यात राजावाडी रुग्णालयाचे शवकक्ष अधिकारी, आणि संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुशील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला. त्यांनी शवागृहातूनच शोध सुरु केला. शवागृहातील १७ आणि कुटुंबियाच्या ताब्यात दिलेल्या मृतदेहांबाबत तपास केला. यात, एका मृतदेहाबाबत संशय आला. मृतदेह कुजल्याने ओळख पटविण्यास अडचण निर्माण होत होती. मृतदेहाच्या एक्सरेमध्ये त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे शुक्रवारी समोर आले. त्यानुसार चौकशी करताच २०१७ मध्ये संबंधित तरुणाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे कुटुंबियांकड़ून स्पष्ट झाले. मात्र कुटुंबियांना ते मान्य नव्हते. अखेर, डीएनए अहवालही पॉझिटिव्ह आल्याने त्यांचा विश्वास बसला. रविवारी तो मृतदेह त्याचाच असल्याचे स्पष्ट झाले.
CoronaVirus News: राजावाडीतील 'तो' बेपत्ता मृतदेह शवागृहातच सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 5:43 AM