Join us

Coronavirus: कोरोनाच्या धास्तीमुळे आमदारांना मिळेना घर; सरकारी खर्चात हॉटेलमध्ये राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 2:11 AM

अधिवेशनाच्या निमित्ताने येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना तपासणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. विधानभवनात ८०० कर्मचारी-अधिकारी काम करतात.

अतुल कुलकर्णी मुंबई : कोरोनाच्या धास्तीमुळे मुंबईत आमदारांना कोणीही घर भाड्याने द्यायला तयार नसल्यामुळे ‘कोणी घर देता का घर’ म्हणायची पाळी त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे आमदारांसाठी हॉटेलच्या खोल्या भाड्याने घेण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी घेतला आहे.

मनोरा आमदार निवासच्या इमारती पाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे आमदारांना निवासासाठी दर महिना एक लाख रुपये देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. मात्र कोरोनामुळे परिस्थिती बदलली आहे. आमदारांकडे ग्रामीण भागातून येणाऱ्यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कुलाबा आणि आजूबाजूच्या परिसरात आमदारांना कोणीही घर द्यायला तयार नाही, अशा तक्रारी आल्यामुळे पुढच्या तीन वर्षांसाठी दीडशे आमदारांना हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकमत’ला दिली. मुंबईतल्या आमदारांना हॉटेलच्या खोल्या देण्यात येणार नाहीत. मात्र मुंबईबाहरेच्या आमदारांसाठी हॉटेलमध्ये सोय केली जाईल. त्यासाठी आमदारांना निवासासाठीचे एक लाख रुपये देण्यात येत आहेत, तीच रक्कम हॉटेलसाठी खर्च केली जाणार आहे. या रूममध्ये आमदार आणि त्याच्यासोबत एक व्यक्ती राहू शकेल. मनोरा आमदार निवासाचे बांधकाम पूर्ण होण्यास किमान तीन वर्षे लागतील. त्यामुळे एवढ्या कालावधीसाठी हॉटेलसोबत करार करण्यात येईल.२१०० जणांची कोरोना तपासणीअधिवेशनाच्या निमित्ताने येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना तपासणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. विधानभवनात ८०० कर्मचारी-अधिकारी काम करतात. ५०० जणांना अधिवेशनासाठी बोलावले जाईल. दोन्ही सभागृहाचे सर्व आमदार, त्यांचे ड्रायव्हर, पीए सर्व मंत्री व मंत्र्यांचे पीए, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी या सगळ्यांची तपासणी ४ ते ६ सप्टेंबर या तीन दिवसांत केली जाईल. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह येईल त्यांना जाता येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसआमदार