मुंबई – राज्यात कोरोना ग्रस्तांचा आकडा वाढत असताना राज्यातील राजकीय वातावरणही चांगलचं पेटू लागलं आहे. राज्यातील घटत्या महसूलाचा विचार करता वाईन शॉप सुरु करण्यास हरकत काय? अशी सूचना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली होती. राज ठाकरेंच्या या सूचनेचा शिवसेनेच्या सामना अग्रलेखातून खोचक समाचार घेण्यात आला होता. त्याला मनसेनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
याबाबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मैं किस पथ से जाऊँ? असमंजस हैं भोलाभाला.खूप दिवस झाले. हल्ली कुणीच विचारत नाही मला अशा शब्दात ‘मधुशाला’ मधली ही ओळ खास बोल बच्चन राऊतसाठी आहे. नागू सयाजी वाडीत बसून शब्दांचे बुडबुडे काढणारे संजय राऊत हे सध्या आपल्याकडे कुणीच लक्ष देत नाही या भावनेने पछाडलेले दिसतात. अन्यथा राज ठाकरेंनी केलेली सूचना त्यांच्या कार्यकारी टाळक्यात शिरली असती. वेळ काय आणि यांचं चाललंय काय? डाईन, वाईन वगैरे शब्दांचे खेळ करत लॉकडाऊनमध्ये वेळ बरा जाण्यापलिकडे फार काही निष्पन्न होणार नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.
त्याचसोबत राज ठाकरेंनी जी सूचना केली ती ताकाला जाऊन भांडे न लपवता केली आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट असताना आता नैतिकतेच्या मायाजालात न अडकता वैधानिक मार्गाने काही उपाय अवलंबण्याची आवश्यकता आहे. त्यात तळी उचलून धरण्याचा प्रश्न कुठे येतो? आणि केवळ दारूच नव्हे, तर उपाहारगृहे आणि अन्य व्यवहारदेखील सुरू करण्याचीही सूचना केली, हे या रडत राऊतांच्या रिकाम्या डोक्यात शिरलेले दिसत नाही. त्यामुळेच मनसेच्या विधायक सूचनेची खिल्ली उडवण्याचा विचार आला असावा असंही अमेय खोपकर म्हणाले.
दरम्यान, तुमचे संकटमोचक अजित पवारांनीही हीच मागणी करणारे पत्र देशाच्या प्रधानमंत्र्यांना लिहिले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही असेच विधान काही दिवसांपूर्वी केले होते. तेव्हा त्यांची खिल्ली उडवण्याची हिंमत या बोरूबहाद्दराला झाली नाही, की मालकांची भीती वाटली? बोरूबहाद्दरांची ‘फ्रायडे नाईट’ जोरदार रंगली असावी, आणि त्याच हॅगओव्हरमध्ये राज ठाकरेंच्या पत्रातले सविस्तर मुद्दे बुडाले. की जे राज ठाकरेंना सुचलं ते आपल्याला आधी का सुचलं नाही, या दु:खाच्या बेहोषीत ‘डाईन, वाईन.’ वगैरे शब्दांचे खेळ कागदावर सांडले? अशा शब्दात अमेय खोपकर यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
व्वा! राज बाबू; वाईन शॉप सुरु करा, मनसेच्या मागणीवर शिवसेनेची खोचक भूमिका, सांगितलं...
कोरोना संकटकाळात दोन चिमुरडे खासदार सुनील तटकरे यांच्या घरची वाट अडवतात तेव्हा...
‘या’ राज्यात १६ मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार; सरकारच्या डॉक्टर समितीने दिले संकेत
...म्हणून पुढील ४८ तास महत्त्वाचे; कोरोना प्रतिबंधक लसीची पहिल्यांदाच मानवावर चाचणी
जाणून घ्या, कुठे आणि कोणती दुकाने उघडण्याची परवानगी?; केंद्रीय गृह मंत्रालयाचं स्पष्टीकरण